आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • No Beauty Contests For Tamil Nadu Colleges, Says Madras High Court

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कॉलेजेस, विद्यापीठांतील सौंदर्य स्पर्धांवर बंदी घाला - मद्रास उच्च न्यायालय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - मद्रास उच्च न्यायालयाने विद्यापीठ तसेच कॉलेजेसमधील सौंदर्य स्पर्धांवर आक्षेप घेतला असून अशा स्पर्धांवर बंदी घालण्याचे निर्देशच तामिळनाडू सरकारला दिले. ‘अभियांत्रिकीचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्याला रॅम्प वॉकिंगमुळे काय फायदा होईल हे समजण्यापलीकडचे आहे,’ अशी टिप्पणीही न्यायालयाने केली.

लक्ष्मी सुरेश यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती टी. व्ही. शिवाग्ननम यांनी हा आदेश दिला. ‘आंतरमहाविद्यालयीन पातळीवर आयोजित सौंदर्य स्पर्धेवर बंदी घालावी किंवा त्याचे आयोजन करू नये,’ असे परिपत्रक विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयांना पाठवावे, असे निर्देश न्यायमूर्तींनी उच्च शिक्षण विभागाच्या सचिवांना दिले.
याचिकाकर्त्या लक्ष्मी सुरेश यांनी याचिकेत म्हटले होते की, अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या माझ्या मुलीने फेब्रुवारी २०१३ मध्ये अण्णा विद्यापीठाशी संलग्न अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे आयोजित वार्षिक सांस्कृतिक महोत्सवात ‘मिस टेकोफेस स्पर्धेत’ भाग घेतला होता. मात्र तिला जाहीर केलेली बक्षीस दिले नाही. फक्त प्रमाणपत्र देऊन तिची बोळवण करण्यात आली आणि त्यावरील स्वाक्षर्‍याही बनावट होत्या. त्यामुळे तिला जाहीर केलेले बक्षीस तसेच भरपाई म्हणून ५ लाख रुपये देण्याचे निर्देश संबंधितांना द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.

विद्यापीठाचे अशा कार्यक्रमांवर नियंत्रण आहे का, अशा कार्यक्रमांचे आयोजन कोण करते या प्रश्नांपेक्षाही सरकारने १०० वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात अशा सौंदर्य स्पर्धच्या आयोजनाची गरज आहे का, असा प्रश्न न्यायमूर्तींनी विचारला. याप्रकरणी विद्यापीठाने आपले म्हणणे मांडावे असे निर्देश न्यायमूर्तींनी दिले. पुढील सुनावणी २० फेब्रुवारीला होईल.