आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुत्तिंगल अग्निकांड: केरळमधील मंदिरांमध्ये आता आतषबाजीवर बंदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोची/कोल्लम - केरळमधील सर्व मंदिरे, धार्मिक स्थळांमध्ये रात्रीच्या वेळी मोठ्या आवाजाच्या फटाक्यांवर बंदी घालण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी दिले. दरम्यान, पुत्तिंगल मंदिर अग्निकांडप्रकरणी देवस्थान व्यवस्थापन समितीच्या ७ सदस्यांसह १३ जणांना अटक करण्यात आली आहे.

उच्च न्यायालयाच्या एका न्यायमूर्तींनी धार्मिक स्थळी फटाक्यांच्या आतषबाजीवर बंदी घालावी, अशी मागणी करणारे पत्र पाठवले होते. हे पत्र जनहित याचिका समजून न्यायालयाने धार्मिक स्थळांमध्ये सूर्यास्त ते सूर्योदय या काळात मोठा आवाज करणाऱ्या फटाक्यांवर बंदी घातली. दिवसा फटाके वाजवल्यास त्यांचा आवाज निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असू नये, असे आदेशही न्यायालयाने दिले. परवूर मंदिर दुर्घटनाप्रकरणी सीबीआय चौकशीची आवश्यकता आहे काय तसेच या प्रकरणात दहशतवाद्यांचा हात आहे काय हे तपासून पाहा, असे आदेशही न्यायालयाने दिले.

१३ जणांना अटक
पोलिसांनी मंदिराच्या ७ विश्वस्तांसह १३ जणांना मंगळवारी अटक केली. मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष जयलाल, सचिव जे. कृष्णमूर्ती, सदस्य शिवप्रसाद, सुरेंद्रन पिल्लई, रवींद्रन पिल्लई यांनी मंगळवारी पहाटे पोलिसांसमोर शरणागती पत्करली. मंदिर व्यवस्थापन समितीचे इतर दोन सदस्य सुरेंद्रनाथन पिल्लई आणि मुरुगेशन यांना सकाळी अटक करण्यात आली. त्याशिवाय आतषबाजीसाठी नियुक्त दोन कंत्राटदारांच्या सहा कामगारांनाही अटक करण्यात आली. पोलिसांनी मंगळवारी पुत्तिंगल मंदिरापासून ५०० मीटर अंतरावरील तीन कारमध्ये ठेवलेले फटाके जप्त करून त्यांची विल्हेवाट लावली.

मुख्यमंत्र्यांची बैठक
केरळ सरकारने मंगळवारी उच्चस्तरीय बैठक घेऊन मदत, बचावकार्य आणि उपचारांचा आढावा घेतला. मुख्यमंत्री ओमेन चंडी अध्यक्षस्थानी होते. राज्य सरकारने मदतकार्यासाठी २० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

मृतांची संख्या १११
दरम्यान, मंगळवारी आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता १११ वर पोहोचली आहे. त्यात आतषबाजी केलेल्या एका कंत्राटदाराचा समावेश आहे. तो या आगीत ९० टक्के भाजला होता. त्याच्या मोठ्या आतड्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. कोलम आणि राजधानी तिरुअनंतपुरम येथील विविध रुग्णालयांत उपचार सुरू असलेल्या २७ जणांची प्रकृती गंभीरच आहे.