आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यू झाला कसा, कुणी विचारलेही नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मथुरा - शहरात गुरुपौर्णिमेचा उत्साह आहे. मात्र, ईट मंडीसमोर गल्लीत सामसूम आहे. १० महिन्यांचा युवराज रडतो किंवा खेळताना ओरडतो तेव्हाच येथील शांतता भंग पावते. २२ वर्षीय आई ज्योतीच्या गर्भातील बाळाला आता वडील व राष्ट्रीय तलवारबाज खेळाडू होशियार सिंह ऊर्फ रॉकी यांचे छत्र हरवले आहे याची कल्पना नाही. या भयंकर प्रसंगातही ज्याेती यांनी दृढनिश्चय व्यक्त केला. युवराज आणि पोटातील तीन महिन्यांच्या बाळास वाढवून रॉकीसारखा आंतरराष्ट्रीय खेळाडू बनवण्याचे त्यांचे स्वप्न आहे. मात्र, त्याआधी आपल्या पतीला न्याय मिळावा, अशी त्यांची इच्छा आहे.

माझ्या पतीला जीआरपीच्या जवानांनी धक्का देऊन पाडले. त्यामुळे ते रेल्वेखाली आले. रेल्वेमंत्र्यांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत रॉकीच्या मृत्यूविषयी चर्चा होत आहे. मात्र, त्यांचा मृत्यू कशामुळे झाला याची विचारणा करण्यासाठी आमच्या घरी अद्याप रेल्वे, जीआरपी, क्रीडा मंत्रालय आणि तलवारबाजी संघाचा कोणताही पदाधिकारी आला नाही. आमच्याशी कसलीही चर्चा न करता अधिकारी-प्रशासन जीआरपी जवानांना निर्दोष ठरवण्यावर ठाम आहेत. कुटुंबात रॉकी, त्यांचे दोन भाऊ मुनीश, दिनेश आणि दोन्ही बहिणी सुमन, भाग्यश्री सर्व तलवारबाजीतील खेळाडू आहेत.

रॉकीची लहानशी खोली पदकांनी भरली आहे. बोलता-बोलता इथेच रॉकीच्या आईचे डोळे पाणावले. ज्योती यांनी त्यांना धीर देत म्हटले की, आता रडायचे नाही, रॉकीला न्याय द्यावयाचा आहे. २१ जुलै या दुर्घटनेच्या दिवसाची आठवण काढत त्या म्हणाल्या, पतियाळात युवराजाचे मुंडण केल्यानंतर आम्ही मथुरेला येणाऱ्या पॅसेंजरमध्ये चढलो होतो. सिकंदराराऊवर रेल्वे थांबली. यादरम्यान माझ्या पोटात वेदना होऊ लागल्या. मी रॉकीला फोन केला तेव्हा ते महिलांच्या डब्यात माझ्याकडे पाणी घेऊन आले. तेवढ्यात जीआरपीचे दोन जवान रामविलास आणि राजेशकुमार तिथे आले. महिलांच्या डब्यात चढू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्या वेळी त्यांनी धावत्या रेल्वेत रॉकीला धक्का दिला तेव्हा तो प्लॅटफॉर्म आणि रेल्वेमध्ये अडकला. पाय कापल्यानंतर रेल्वे थांबली. त्यानंतर रेल्वे मागे-पुढे झाली आणि त्यांची कंबर रेल्वेखाली आली. मी संपूर्ण स्थानकात जोरजोराने किंचाळले, हंबरडा फोडला; परंतु कोणीही पुढे आले नाही. स्थानकावर उपस्थित कर्मचारी अशा घटना होतच राहतात, असे म्हणाला. तुम्ही इथे रडत बसू नका, खोलीत बसा. रॉकी यांच्या निधनाला १२ दिवस झाले. मात्र, अद्याप मी, सासू अथवा कुटुंबातील अन्य सदस्याशी पोलिस किंवा अन्य अधिकारी बोलले नाहीत. आमच्याकडून एफआयआर दाखल करून घेण्याची अौपचारिकता करण्यात आली. वृत्तपत्रातील बातम्यांत जीआरपी एसपी आणि आरपीएफचे वरिष्ठ अधिकारी रॉकीलाच दोषी ठरवत आहेत. रॉकीने सहा वेळेस सन २००४-२०१० पर्यंत राष्ट्रीय स्तरावर उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व केले. यादरम्यान २००४ मध्ये चेन्नईतील सहाव्या राष्ट्रीय युवा तलवारबाजी स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आहे. माझा संघर्ष केवळ पतीसाठी नाही. पोलिस जवानाने अन्य कोणाला अशी अमानुष वागणूक देऊ नये हा माझा उद्देश असल्याचे ज्योती यांनी सांगितले.आग्रा विभागाच्या रेल्वे पोलिसांचे एसपी जी. एन. खन्ना यांनी ‘दिव्य मराठी’ नेटवर्कला सांगितले की, कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर खटला दाखल केला होता. रेल्वे बोर्डाकडून आम्ही चौकशी समितीही स्थापन केली आहे.

आम्ही केलेल्या चौकशीत ट्रेन गार्डने आपल्या अहवालात म्हटले की, स्थानकावर चालत्या गाडीत ते पाठीमागून चढण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान पाय घसरल्याने ते रेल्वे आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकले. जवानांनी त्यांचा मृतदेह काढला. रेल्वे मंडळाला अहवालही देण्यात आला. होशियार सिंह यांच्या कुटुंबीयांशी अद्याप का बोलणे झाले नाही? अशी विचारणा केली तेव्हा खन्ना म्हणाले, एफआयआर दाखल केला आहे. कुटुंबीय दु:खात आहे. होशियार सिंह यांच्या तेराव्यानंतर सोमवारी किंवा मंगळवारी पोलिस त्यांच्या घरी जातील. आम्ही सीओच्या अध्यक्षतेखाली पथक स्थापन केले आहे. २१ जुलै रोजी दुर्घटनेच्या सायंकाळी दिल्लीत असलेल्या वडिलांना फोनवरून माहिती दिली. रात्री दहा वाजता स्थानकावर पोहोचलो तेव्हा रेल्वे पोलिसांचे सहकार्य मिळाले नसल्याचे राॅकीचे मोठे भाऊ मुनीश कुमार यांनी सांगितले. मृतदेह नेण्यासाठी जीआरपीच्या लोकांनी गाडी केली. आमच्याकडून त्यांनी त्यासाठी एक हजार रुपये घेतले. यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह कासगंजहून एटाला नेणे भाग पडले तेव्हाही वाहन भाड्याचे ५०० रुपये घेण्यात आल्याचे मुनीश यांनी सांगितले.
छायाचित्र: पती होशियार सिंहसोबत ज्योती आणि १० महिन्यांचा मुलगा युवराज.