आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शौचालय न बांधल्यास रेशनही मिळणार नाही, पुद्दुचेरी सरकारचा निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुद्दुचेरी- स्वच्छ भारत अभियानात शौचालये बांधण्यासाठी अनुदान घेऊनही ३० सप्टेंबरपू्र्वी शौचालये बांधली नाही तर अशा कुटुंबांना कुठल्याही कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणार नाही, अशी घोषणा पुदुचेरी सरकारने सोमवारी केली.

स्थानिक प्रशासन विभागाचे सचिव एच .जवाहर यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ज्यांच्या घरात शौचायले नाहीत अशा कुटुंबाना शौचालयासाठी २० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. ही रक्कम देशभरात सर्वाधिक आहे. केंद्रशासित प्रदेश पांदणमुक्त करण्यासाठी आम्ही अनुदान वाढवून दिले आहे. अनेक कुटुंबांना पहिल्या हप्त्याची रक्कम मिळालीही आहे, पण त्यांनी अजूनही शौचालये बांधली नाहीत. शौचालये बांधण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने अनेक कार्यक्रम आयोजित केले होते. पण काही किरकोळ कारणे पुढे करून शौचालय बांधण्यास टाळाटाळ केली जात आहे.

ज्यांना अनुदान मिळाले आहे, पण शौचालये बांधली नाहीत त्यांना ३० सप्टेंबरपर्यंतची शेवटची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत काम न झाल्यास अशा कुटुंबांना सर्व कल्याणकारी योजनांच्या लाभापासून वंचित ठेवले जाईल, स्वस्त धान्य दुकानातून रेशनही मिळणार नाही. त्याचप्रमाणे त्यांना प्रधानमंत्री आवास योजना, शैक्षणिक मदत आणि इतर योजनांचा लाभही मिळणार नाही. अनुदानाची रक्कम घेऊन तिचा वापर शौचालय बांधकामासाठी केला असेल अशा कुटुंबांच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या अर्जांवर प्राधान्याने विचार करून त्यांना घरे दिली जातील, अशी माहितीही जवाहर यांनी दिली. दिलेल्या मुदतीत नागरिक आपापल्या घरात शौचालये बांधतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

सार्वजनिक आरोग्याबाबत पुद्दुचेरीचा १८९ वा क्रमांक
सार्वजनिक आरोग्याबाबत नुकतेच राष्ट्रीय सर्वेक्षण झाले होते. त्यात पुद्दुचेरी महानगरपालिका १८९ व्या तर उझवारकारी पालिका २०६ व्या क्रमांकावर होती. सरकारच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर आहे, असा उल्लेखही जवाहर यांनी केला.
बातम्या आणखी आहेत...