आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Not Ak 47, Android One Have A Hand On Kashmir Resident

काश्मिरी जनतेला एके ४७ नव्हे, अँड्रॉइड वन हवे - पंतप्रधान नरेंद्र मोदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर/सांबा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी सांबा आणि श्रीनगरमध्ये सभा घेतल्या. दोन्ही ठिकाणी त्यांनी राज्यातील नॅशनल कॉन्फरन्स सरकारवर हल्ला चढवला. ते म्हणाले, एके ४७ बंदुकीवर बोट ठेवल्यावर माणसाचे प्राण जातात. मात्र, ईव्हीएमवर बटन दाबल्यास देशाचे आयुष्य पालटते. काश्मिरी जनतेला एके ४७ नव्हे तर अँड्रॉइड वन हवे असल्याचेही ते म्हणाले.

मोदी यांनी त्याआधी सांबा जिल्ह्याच्या विजयपूरमध्ये म्हटले की, जम्मू-काश्मीरच्या जनतेने दहशतवादी हल्ल्यानंतरही ७० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान करून एके ४७ पेक्षा ईव्हीएम मशीन जास्त बळकट असल्याचे सा-या जगाला दाखवून दिले आहे. आपल्या स्वप्नांच्या पंखांना सामर्थ्य देण्यासाठी या भरकटलेल्या तरुणांच्या हातात अँड्राइड व कॉम्प्युटर असावे अशी आमचीही इच्छा आहे. येथील दहशतवाद समाप्त झाला. मात्र, भ्रष्टाचार अद्याप संपला नाही.

काश्मिरींच्या समस्या सोडवण्यासाठी आलो
मोदी म्हणाले, तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी मी इथे आलो आहे. केसर व दल सरोवरासाठी प्रसिद्ध असलेल्या काश्मीर खो-याचे गतवैभव मिळवून देणार आहे. पर्वतावरून कोसळणारे पाणी व तरुणांचा योग्य उपयोग झाला पाहिजे. काश्मिरींनी अनेक हातखंडे वापरले आहेत. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. आता केवळ एक पर्याय शिल्लक आहे आणि तो म्हणजे विकास.

तिस-या टप्प्यातील मतदान आज
उमर अब्दुल्ला यांच्या मतदारसंघासहित जम्मू काश्मीरच्या १६ जागांवर मंगळवारी मतदान होत आहे. राज्यात बारामुल्ला, पुलवामा आणि बडगाम जिल्ह्यात मतदान होईल. झारखंडच्या १७ जागांवरही मतदान होणार आहे.

पिता-पुत्र, पिता-कन्या यांनी परिस्थिती बदलली नाही
मोदी म्हणाले, काँग्रेसशिवाय पिता-पुत्राची जोडी (फारुख आणि ओमर अब्दुल्ला) तसेच पिता व कन्येची जोडी (मुफ्ती मोहंमद सईद व महबुबा मुफ्ती) यांनी सरकार चालवले. मात्र त्यांच्यामुळे लोकांच्या स्थितीत बदल झाला काय? काँग्रेस चलाख पक्ष आहे. नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी ज्याची चलती आहे, त्यांच्या पदराखाली जाऊन बसतो. यानंतर ते त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसून जनतेला धोका देतात.