आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘थ्रीडी अॅनिमेटेड मोशन पेंटिंग’, थ्रीडी कलाकृती उघड्या डोळ्यांनी पाहता येणार!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - खास चष्म्याशिवाय म्हणजेच उघड्या डाेळ्यांनी आता थ्रीडी कलाकृती पाहता येणे शक्य आहे. अमरावती येथील कलावंत विजय राऊत यांनी ‘थ्रीडी अॅनिमेटेड मोशन पेंटिंग’चे अनोखे संशोधन केले आहे. जगातील आठवे आश्चर्य ठरणाऱ्या ‘थ्रीडी अॅनिमेटेड मोशन पेंटिंग’चे मागील आठवड्यात दुबईच्या आर्ट बहरीनमध्ये प्रमोशन करण्यात आले. चित्रकलेतील हा बदल भविष्यात क्रांतिकारक ठरणार आहे.

त्रिमितीय (थ्रीडी) हा कलाप्रकार तसा प्रचलित आहे. मात्र, विजय राऊत यांनी चित्रांना जिवंत (मोशन देण्याची) करण्याची किमया केली आहे. ‘थ्रीडी अॅनिमेटेड मोशन पेंटिंग’च्या समोरून फिरल्यास त्यातील वेगवेगळे भाव चलचित्राप्रमाणे अनुभवता येते.
जगप्रसिद्ध चित्रकारांपैकी काही जण थ्रीडी पेंटिंग काढतात, मात्र ‘थ्रीडी अॅनिमेटेड मोशन पेंटिंग’ निर्माण करण्याची किमया अनेकांना साध्य करता आली नाही. कला आणि तंत्रज्ञानाचा सुरेख संगत साधत राऊत यांनी या नवीन कलाप्रकाराची निर्मिती केली आहे. चित्रकार कॅन्व्हासवर चित्र रेखाटतो, तर राऊत यांनी अॅनिमेशनच्या मदतीने चित्रकलेमध्ये गती आणत नवीन क्रांती केली आहे. चित्रकार चित्रांमध्ये जीव ओततात, मात्र विजय राऊत यांनी चित्रांमध्ये आत्मा टाकण्याचे कार्य केले आहे. फिजिकल आणि डिजिटल स्वरूपात या चित्राची निर्मिती होत असल्याने एक पेंटिंग तयार करण्यास तब्बल चार महिन्यांचा कालावधी लागतो. एखाद्या ठिकाणी ठेवलेल्या चित्राला आपण फिरल्यास गती मिळत असेल, तर हा अनुभव कसा असेल याची केवळ आपण कल्पना करू शकतो. मात्र, राऊत यांनी ही कल्पना प्रत्यक्षात साकारली आहे. घरातील एखाद्या प्रिय व्यक्तीचे स्वभावगुण दर्शवणाऱ्या चित्रांची निर्मिती करणे यामुळे शक्य होईल. शिवाय हरवलेल्या क्षणांची साठवणूक या माध्यमातून भविष्यात करता येईल. त्यामुळे भविष्यात या कलाप्रकाराला प्रचंड मागणी राहणार, यात शंका नाही. येथे होणार उपयोग चित्रपटसृष्टी, टी.व्ही. सिरीयल, व्हिडिओ गेमिंग, कॉमिक्स डिझाइन, प्रिंट मीडिया, जाहिरात संस्था
दुबईत प्रमोशन
कला व तंत्रज्ञानाबाबत जागरूकता असलेल्या दुबई येथे विजय राऊत यांच्या ‘थ्रीडी अॅनिमेटेड मोशन’ चित्रांचे प्रमोशन २१ ते २७ मे दरम्यान करण्यात आले. जगप्रसिद्ध प्रमोटर अंिबका वोरा यांच्याकडून आर्ट बहरीन या संस्थेकडून राऊत यांच्या ‘प्रभूपाद’, ‘ह्युमन’, ‘ड्रीम लव्ह’, ‘हॉर्स रायडिंग’ आदी चित्रांचे सर्वप्रथम प्रमोशन करण्यात आले. दुबई येथील विविध अॅनिमेशन कंपन्यांना राऊत यांनी यादरम्यान डेमोदेखील दिले.
बहरीनमध्ये प्रदर्शन
बहरीन येथील राणी तसेच सुप्रीम कौन्सिल ऑफ वुमेन्सच्या अध्यक्ष साबिका बिंत इब्राहिम अल-खलिता यांच्याकडून ऑक्टोबर महिन्यात विजय राऊत यांच्या ‘थ्रीडी अॅनिमेटेड मोशन’ चित्रांचे प्रदर्शन भरवले जाणार आहे. दुबई येथील भेटीदरम्यान प्रमोटर अंबिका वोरा यांच्याकडून तसे संकेत मिळाल्याची माहिती आहे.
देशात प्रचलित अभ्यासक्रम
भारतातील अहमदाबाद येथील एनआयडी, कोलकाता स्कूल ऑफ ऑर्ट तसेच मुंबई येथील सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट येथे प्रचलित अभ्यासक्रम शिकवले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना चित्रकला आणि अॅनिमेशन यांच्या संगमातून निर्माण होणाऱ्या कलाकृतीची जाणीवदेखील होत नाही. अॅनिमेशन अभ्यासक्रम शिकवणारे एकमेव कॉलेज अमरावतीत असल्याची माहिती राऊत यांनी दिली.
जे. जे. चे गोल्ड मेडलिस्ट
विजय राऊत हे मुंबई येथील सर जे. जे. स्कूल ऑर्ट येथील सुवर्णपदक प्राप्त विजेते विद्यार्थी आहेत. १९८७ मध्ये त्यांनी जे. जे. मधून कलेचे शिक्षण घेतले. शिवाय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे शिक्षण घेत असलेल्या कालखंडात राऊत यांनी जे. जे. मधून अभ्यासक्रम पूर्ण केला.

कलेतील प्रगत प्रकार
^ थ्रीडी मोशनमधील प्रचलितपेक्षा हा प्रगत प्रकार असून, त्याला आपण फ्यूचर आॅर्टदेखील म्हणू शकतो. अनेक क्रांतिकारक बदल होत जग पुढे जात आहे. बदलत्या जगात कलादेखील पुढे गेली पाहिजे, असे प्रकर्षाने जाणवत असल्याने अशा प्रकारच्या कलाकृती निर्मितीची प्रेरणा मिळाली. पेंटिंग असल्याने साहजिकच थ्रीडी असले, तरी उघड्या डोळ्यांनी अनुभवता येणार आहे. चित्र असल्याने किरणांचा संबंध येत नाही.
विजय राऊत, संचालक, द कॉलेज ऑफ अॅनिमेशन बायो-इंजिनिअरिंग अँड रिसर्च सेंटर, अमरावती.
बातम्या आणखी आहेत...