अलवर (राजस्थान) - केम्ब्रिज, ऑक्सफोर्ड व हार्वर्डसारख्या विद्यापीठांत शिक्षण घेण्याची अल्पसंख्याकांची इच्छा आता सहज पूर्ण होऊ शकेल. शिक्षणासाठी दिल्या जाणा-या कर्जापैकी २० लाखांपर्यंतच्या कर्जावरील व्याज आता केंद्र सरकार भरणार आहे. अल्पसंख्याक मंत्रालयाने विशेष योजनेअंतर्गत ही सुविधा दिली आहे.
२०१३-१४ मध्ये परदेशात प्रवेश घेतलेल्या कर्जदार विद्यार्थ्यांनाही याचा लाभ मिळेल. यासाठी त्यांना कर्ज घेतलेल्या बँकेकडे अल्पसंख्याक प्रमाणपत्र द्यावे लागेल. पदव्युत्तर, पीएचडी अशा अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ घेता येईल. विद्यार्थ्यांना कोणत्याही खासगी किंवा राष्ट्रीयीकृत बँकेत अर्ज करता येईल. मंत्रालयाच्या www.minorityaffairs.gov.in या वेबसाइटवर योजनेची माहिती दिली आहे.
यांना मिळेल लाभ : मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन आणि पारशी समाजातील विद्यार्थी यासाठी पात्र असतील. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न सहा लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्याने परदेशात शिक्षणासाठी प्रवेश घेतलेला असावा.
आजवर अशी होती योजना : अल्पसंख्यांक विद्यार्थी ३ टक्के व्याजदराने मर्यादित रकमेचे शिक्षण कर्ज घेऊ शकत होता. मात्र, हप्ता चुकला तर व्याजाची रक्कम वाढत जात होती.
आता हा लाभ :परदेशात अल्पसख्यांकांची मुले सहज शिक्षण घेऊ शकतील. कारण, हे व्याज आता केंद्र सरकार फेडेल. मुद्दल मात्र फेडावे लागेल.
हे लाभापासून वंचित : ज्या विद्यार्थ्यांनी परदेशातील शिक्षण अर्ध्यावर सोडले असेल किंवा त्याला संबंधित संस्थेने काढून टाकले असेल किंवा ज्याने परदेशी नागरिकत्व मिळवले असेल.