आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एनएसजी मोहिमेची गरज मुळीच नव्हती : श्रीनिवासन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - अणुपुरवठादार गटामध्ये सदस्यत्व मिळावे यासाठी भारताने राबवलेली मोहीम अनावश्यक होती. ते अनावश्यक नाट्य ठरले आहे, असे प्रसिद्ध संशोधक तथा अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष एम. आर. श्रीनिवासन यांनी म्हटले आहे.

एनएसजीमध्ये प्रवेश मिळावा म्हणून भारताने केलेली जाेरदार मोहीम अयशस्वी ठरली. वास्तविक ही मोहीम सुरू करण्याचा सल्ला देणे हीच मोठी चूक होती. सरकारला चुकीचा सल्ला देण्यात आला आहे. एनएसजीमधील सदस्य राष्ट्रांसोबत भारताचे अगोदरच करार आहेत. त्यात रशिया, फ्रान्स, अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रांचा समावेश आहे. अशा देशांसोबत भारताचा करार असल्यामुळे भारताला त्यांच्याकडून युरेनियमसह अणुऊर्जेच्या बाबतीत अनेक प्रकारचे सहकार्य केेले जाते. कझाकस्तान, कॅनडा, ऑस्ट्रेलियासारख्या देशांकडून भारताला मदत मिळते. त्याचा फायदा देशाच्या अणुऊर्जा कार्यक्रमाला होणार आहे. म्हणूनच एनएसजीमध्ये जाण्याचा अट्टहास करण्याची गरज नव्हती. ही मोहीम तर अनावश्यक होती, असा दावा श्रीनिवासन यांनी केला. ते शनिवारी वृत्तसंस्थेशी बोलत होते. श्रीनिवासन हे पद्मभूषणप्राप्त संशोधक आहेत. दरम्यान, श्रीनिवासन यांनी देशाच्या अणुऊर्जा कार्यक्रमात अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे. हेवी वॉटर रिअॅक्टर प्रकल्पात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. मुलाखतीमध्ये त्यांनी प्रसारमाध्यमांचीही चूक सांगितली. या विषयावर अतिरंजित चर्चा घडवण्यात आली. एनएसजीचे वर्णन एलिट वर्ग म्हणून करण्यात आले आहे. मग न्यूझीलंड, आयर्लंडसारखे अनेक देश ४८ राष्ट्रांच्या संघटनेचे अद्यापही सदस्य नाहीत, असे श्रीनिवासन यांनी सांगितले.

विचारलेही नाही
सरकारने अणुऊर्जा आयोगाकडे एनएसजीबाबतच्या माेहिमेसाठी सल्लामसलत केली असती तर फार बरे झाले असते. अजूनही मी आयोगाचा सदस्य आहे. परंतु त्यांनी (सरकार) आयोगाकडे याबाबत विचारणा केली नाही. आम्हाला विचारले असते तर मी हा मुद्दा उपस्थित केला जाऊ नये, असाच सल्ला दिला असता. परंतु आयोगापुढे हा विषय आला नाही. हे दुर्दैवच. हा विषय परराष्ट्र विभागापुरता मर्यादित आहे.. असे त्यांना वाटले असावे. मला ठाऊक नाही. पण अनावश्यक नाट्याची ( एनएसजीसाठी मुत्सद्दी मोहीम) गरज नव्हती.

अणु कार्यक्रमावर परिणाम नाही
एनएसजीसारख्या गटात प्रवेश मिळाला नाही. म्हणून त्याचा परिणाम देशाच्या अणु कार्यक्रमावर होईल, असे समजण्याचे मुळीच कारण नाही. कारण देशाकडे संयंत्रांचे डिझाइन, त्याची रचना, उत्पादन इत्यादी गोष्टी करण्याची क्षमता आहे. देशाच्या एनएसजी प्रवेश मोहिमेला आलेल्या यशाचा त्यामुळेच अणुऊर्जा कार्यक्रमावर काहीही वाईट परिणाम होणार नाही, असे श्रीनिवासन यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

भारताला सवलती सुरूच : भारताला २००८ मध्ये काही सवलती मिळाल्या हाेत्या. त्या सवलती अद्यापही सुरू आहेत. त्यामुळे आपण अाण्विकदृष्ट्या सक्षम असलेल्या देशांसोबत अणुव्यापार करता येऊ शकतो. प्रसारमाध्यमातून या विषयावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. त्यामुळे अपेक्षा वाढल्या होत्या. खरे तर नव्या सवलतींची गरज नाही. म्हणूनच गटाच्या सदस्यत्वाची फारशी आवश्यकता वाटत नाही, असे श्रीनिवासन म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...