आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • One And Half Thousand Years Tiladhak Mahavihar University In Bihar

बिहारमध्ये सापडले दीड हजार वर्षांपूर्वीच्या 'तिलाधक महाविहार विद्यापीठाचे अवशेष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - हजारो वर्षे जुन्या नालंदा आणि विक्रमशीला विद्यापीठ ही बिहारची ओळख आहे. त्यात आता नालंदापासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर आणखी एका प्राचीन विद्यापीठाचे अवशेष सापडले आहेत. ‘तिलाधक महाविहार’ असे या विद्यापीठाचे नाव आहे. पंधराशे वर्षे जुने असलेले हे विद्यापीठ सुमारे एक किलोमीटर परिसरात पसरलेले आहे.
या परिसरात बिहार पुरातत्त्व खात्यातर्फे उत्खनन सुरू आहे. ‘तिलाधक महाविहार’ नालंदाच्या एकंगरसरायच्या तेल्हाडामध्ये आहे. चार वर्षांपूर्वी याठिकाणी उत्खनन सुरू करण्यात आले होते. त्या प्रयत्नांना आता यश आले आहे. सुमारे तेराशे वर्षांपूर्वी (सातव्या शतकात) चीनचा पर्यटक ह्यु-एन-त्संग या परिसरात आला होता. त्यांच्या माहितीनुसार या परिसराचे नाल ‘तेलीद्का’ असे सांगण्यात आले आहे. त्यांनी ज्याप्रमाणे माहिती दिली आहे, तेच सर्व उत्खननामध्ये सापडत आहे. त्याच्या माहितीनुसार ‘तिलाधक महाविहार’ मध्ये बौद्ध समाजाचे लोक उच्च शिक्षण घेत होते. पाचव्या शतकात याची स्थापना झाली होती. याठिकाणी तीन मंदिरांचे अवशेषही सापडले आहेत.
एका वेळी हजार लोकांची प्रार्थना : उत्खननामध्ये एक मोठी जागा आढळून आली आहे. पुरातत्त्व विभागाच्या मते याठिकाणी एका वेळी सुमारे एक हजार बौद्ध अनुयायी प्रार्थना करायचे. नालंदा विद्यापीठात शिक्षण घेतल्यानंतर संशोधनासाठी विद्यार्थी याठिकाणी जात असावे, असे अवशेषांवरून जाणवत आहे. याठिकाणी मातीचे दोन-दोन इंचांचे शिल्प मिळाले आहेत. त्यावर विद्यार्थ्यांची नावे लिहिण्यात आली आहेत. नालंदा विद्यापीठाला आव्हान देण्यासाठी या विद्यापीठाची स्थापना केली असावी, ही शक्यताही नाकारता येत नाही.
जाळल्याचे पुरावे सापडले
तिलाधक विद्यापीठात सातव्या शतकाच्या सुरुवातीलाच शिक्षणकार्य बंद करण्यात आले होते. पाल कालखंडात पुन्हा ते सुरू करण्यात आले. त्यानंतर 12 व्या शतकात बख्तियार खिलजीने या विद्यापीठाला आग लावली होती. जाळल्या गेल्याचे पुरावे याठिकाणी सापडले आहेत. कारण उत्खननामध्ये सुमारे एक फूट राख मिळाली आहे. खिलजीने याठिकाणी मशीद बनवली होती. त्याच्या खांबांवर कलश व घोडे व कमळांची चित्रे आहेत. सध्या उत्खननाचे काम सुरूच आहे. ते अनेक वर्षे चालणार आहे. सध्या येथे एक संग्रहालय तयार करण्याचे नियोजन आहे. तसेच येथे सापडलेल्या अवशेषांचे प्रदर्शन भरवण्यात येईल.