कुपवाडा - जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलावर हल्ला करणाऱ्या आंदोलकांना हुसकावून लावण्यासाठी जवानांनी शुक्रवारी केलेल्या गोळीबारात एक विद्यार्थी ठार झाला. या घटनेत किमान तीन जखमी झाले. हंदवाडातील चार व्यक्तींच्या मृत्यूच्या चौथ्या दिवशी कुपवाडा आणि त्यानजीकच्या भागात आंदोलन झाले. एका तरुणीची छेडछाड केल्याच्या आरोपानंतर मंगळवारी हंदवाडामध्ये स्थानिक नागरिकांनी आंदोलन केले होते. या वेळी सुरक्षा दलाने केलेल्या गोळीबारात चौघांचा मृत्यू झाला होता. कुपवाडाच्या नाथनुसा भागात नमाजानंतर हिंसक आंदोलन करण्यात आले. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी गोळीबार करण्यात आला. यामध्ये चार जण जखमी झाले. जखमींपैकी अारिफ अहमद या तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
शुक्रवारच्या घटनेमुळे या प्रकरणातील बळींची संख्या पाच झाली आहे. जमावाला दगडफेक करण्यापासून रोखण्यात आले. मात्र, परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे गोळीबार करणे भाग पडल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. उत्तर काश्मीरमधील परिस्थिती चिघळली आहे. अनेक लोक रस्त्यावर उतरून प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त करत आहेत. श्रीनगर शहरासह दक्षिण काश्मीरमधील काही भागातही आंदोलन झाल्याचे वृत्त आहे.