आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Only One Fingers To The Two Hands; But Get IIT Admission

हातांना फक्त एकेक बोट; जिद्दीच्या बळावर आयआयटीत धडक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोड्डा (झारखंड) - दोन्ही हातांना फक्त एकेक करंगळी. हाताला पंजा जवळपास नाहीच. दोन्ही पायांनासुद्धा एकेकच बोट. 19 वर्षे वयातील एखादाच दिवस औषधाविना गेला असावा. मात्र, अशा विपरीत परिस्थितीवर मात करून शुभम नावाच्या या जिद्दी तरुणाने आयआयटीत धडक मारली आहे. शुभम सध्या आयआयटीत मेकॅनिकल शाखेचे शिक्षण घेत आहे.


हाताच्या टोकावर असलेल्या करंगळीच्या साहाय्याने कसे काय लिहिता येते, असा आपल्या मनात पडलेला प्रश्न शुभम चुटकीसरशी सोडवतो. करंगळीने पेन पकडून तो सरसर लिहून दाखवतो. लिहिता लिहिता सांगतो की, लहानपणापासून डोळ्यांतून सतत पाणी वाहते. पाणी पुसून पुसून डोळ्यांभोवती काळे डाग पडले आहेत. डाव्या कानाने कमी ऐकू येते. बालपणी दुधाचे दात आले, त्यानंतर दातच आले नाहीत. सध्या तोंडात असलेल्या दातांपैकी अनेक दात तुटत आहेत. फक्त मेंदू सोडल्यास शरीरात अनेक व्यंग असल्याचे शुभम सांगतो. हातापायांशिवाय फक्त मेंदूच्या बळावरच पुढे जाण्याचा निर्धार शुभमने केला आहे.


शुभमची आई आणि घरच्यांनी त्याला सतत पुढे जाण्याची प्रेरणा दिली. आई रंजनादेवी सांगतात की, दोन्ही हातांना फक्त एकेक बोट घेऊन जन्मलेल्या या मुलाला पाहून लोक उलटसुलट बोलत, पण पोटच्या मुलाला टाकून कसे देणार? वयाच्या अवघ्या तिस-या महिन्यात शुभमने ‘माँ’अशी हाक मारली. तेव्हाच लक्षात आले की, हा मुलगा इतरांपेक्षा वेगळा आहे. मोठ्या हिमतीने मुलाला स्वत:च्या पायावर उभे करण्याचा निर्धार केल्याचे रंजनादेवी सांगतात. त्यानंतर शुभमचे शिक्षण सुरू झाले. 2009 मध्ये 10 वी उत्तीर्ण झाल्यावर शुभमने 2012 मध्ये आयआयटीत धडक मारली.


शुभम म्हणतो की...
विपरीत परिस्थितीशी लढणे यालाच तर जीवन म्हणतात. माणसाचा जन्म फार नशिबाने मिळतो, म्हणूनच काही तरी वेगळे करण्याच्या इच्छेने मी आयआयटीत आलो. प्रवाहासोबत तर मेलेले मासे वाहतात, जिवंत मासेच प्रवाहाविरोधात पोहू शकतात.