आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनाथ मुलगा बनला आंतरराष्ट्रीय उद्योजक, अमेरिकेला जाण्याची संधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - नियतीची साथ मिळाल्याने एका रस्त्यावर भटकणाऱ्या अनाथ मुलाला मोठी संधी मिळू शकली. हा मुलगा कोलकात्याच्या रस्त्यांवर, रेल्वेस्थानकावर भटकत असे. डोक्यावर छत नव्हते. कसेबसे त्याला पोट भरता येत होते. आता तो यशस्वी उद्योजक बनला आहे. अशोक पालला अमेरिकेच्या मियामी विद्यापीठाचे विद्यावेतन मंजूर झाले. तो आज कोलकात्याच्या पार्क सर्कस परिसरात आपल्या छोट्याशा खोलीत ‘स्काय कर्सर’ नावाची कंपनी चालवत आहे. २१ वर्षीय अशोक संकेतस्थळ विकासक म्हणून काम करतो. त्याचे बहुतांश ग्राहक परदेशी आहेत.
मियामी डेड कॉलेजमध्ये त्याने १ वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. जूनमध्ये त्याने स्काय कर्सर नामक कंपनी सुरू केली. अभ्यास करत असतानाच या उद्योगाची प्रेरणा मिळाली. कोणाच्याही मदतीशिवाय स्वत:चे युनिट कसे सुरू करता येईल, याची कल्पनाही त्याच वेळी सुचल्याचे अशोकने सांगितले. बालवयातही तो संगणकात निपुण होता. त्यामुळेच अमेरिकन परराष्ट्र विभागाच्या अनुदानावर चालणाऱ्या कम्युनिटी कॉलेजसाठी त्याची निवड झाली. तिथे त्याने माहिती तंत्रज्ञान विषयात अभ्यासक्रम पूर्ण केला. महाविद्यालयीन अभ्यासात अनंत अडचणी आल्या. मात्र, ध्येय उच्च असल्यानेच मी स्वत:ची कंपनी सुरू करू शकलो, असे अशोक सांगतो. अशोक पालला कोणी नातलग नाही. त्याची वाढ फुटपाथ व रेल्वेस्टेशनवर झाली. १० वर्षांचा झाल्यावर डॉनबास्को आशालयमच्या कर्मचाऱ्यांनी त्याला शाळेत पाठवायला सुरुवात केली. बोर्ड परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर टेरा इंडिका फर्निचर वर्कशॉपमध्ये काम केले व पुढील शिक्षणासाठी पैसे जमवले.

इंग्रजी समजावे यासाठी शिक्षकांचे सहकार्य
अमेरिकेला गेल्यानंतर तेथील इंग्रजी उच्चारण समजणे हे त्याच्यासाठी सर्वात मोठे आव्हान होते. मात्र, तेथील शिक्षकांनी खूप सहकार्य केल्याचे पालने सांगितले. वर्गात ते जाणीवपूर्वक संथ गतीने इंग्रजी बोलत व लेक्चरनंतरही चर्चा करण्याची तयारी दाखवत. इंटरनेटवर उपलब्ध ट्युटोरियल्समुळेही मदत मिळत होती.