आग्रा - उत्तर प्रदेशमधील इस्लाम धर्मातून हिंदू झालेल्या काही कुटुंबांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि बजरंग दलावर गंभीर आरोप केले आहेत. या दोन्ही संघटनांतील कार्यकर्त्यांनी पैसे व रेशन कार्डाचे आमिष दाखवून आमचे धर्मांतर करवून घेतल्याचा आरोप या मूळच्या मुस्लिम असलेल्या कुटुंबांनी केला आहे. बजरंग दलाने या आरोपांचा स्पष्ट इन्कार केला.
कोणतेही आमिष दाखवण्यात आले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सोमवारी ६० मुस्लिम कुटुंबांतील २५० सदस्यांनी हिंदू धर्मात प्रवेश केला. एका योजनेअंतर्गत आम्हाला रेशन व आधार कार्ड बनवून दिले जातील असे सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात त्या ठिकाणी गेल्यावर आमचे धर्मांतर करण्यात आले.
संघटनांच्या प्रतिक्रिया
बजरंग दल : हिंदू धर्मात प्रवेश केलेले लोक अत्यंत गरीब कुटुंबातले आहेत. हे सर्व वाल्मीकी समाजातील आहेत. त्यांना चिथावण्यात आले आहे. ते घाबरलेले असून त्यांना कोणीही आमिष दाखवलेले नाही, असे जिल्हाध्यक्ष अज्जू चौहान यांनी सांगितले.
आरएसएस : हिंदू धर्मातून दूस-या धर्मात प्रवेश केलेल्यांना पुन्हा हिंदू धर्मात आणण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. येत्या नाताळात अलिगड येथील मुस्लिम व ख्रिश्चन धर्मात गेलेल्या ५००० लोकांना पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजेश्वर सिंह यांनी सांगितले.
बसपा : या प्रकरणाची चौकशी करून कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. धार्मिक तणाव निर्माण करून त्याचा राजकीय फायदा करून घेण्याची आरएसएस, बजरंग दल व भाजपची रणनीती राहिली आहे.
काँग्रेस : मुस्लिम कुटुंबीयांनी स्वत:च्या इच्छेने हिंदू धर्मात प्रवेश केला असेल तर त्यावर आक्षेप घेऊ नये. मात्र त्यांच्यावर दबाव आणला असेल तर ही गंभीर बाब आहे. काँग्रेस अशा प्रयत्नांचा निषेध करते, अशी भूमिका काँग्रेसचे प्रवक्ते द्विजेंद्र त्रिपाठी यांनी मांडली.
समाजवादी पार्टी : बळजबरी, आमिष दाखवून धर्मांतर केले असेल तर हा कायद्याने गुन्हा असल्याचे राजेंद्र चौधरी यांनी सांगितले.
नेमके प्रकरण काय
धर्मांतराचा कार्यक्रम आग्र्याच्या देवरी रोड येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे आयोजन आरएसएसची शाखा धर्म जागरण समन्वय विभाग व बजरंग दल यांनी केले होते. ‘पुरखों की घर वापसी’ या नावाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ब्राह्मणांच्या हस्ते सगळ्यांकडून हवन व मंत्रोच्चार करवून घेण्यात आले. त्यानंतर सगळ्यांनी
आपल्या घरांवर भगवा झेंडा लावला. अशा प्रकारे हिंदू धर्मात त्यांनी प्रवेश केला. मंदिरात दर्शन घेऊन प्रसाद ग्रहण केला.