आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pak Ghazal Singer Ghulam Ali To Perform At Varanasi Temple

मंदिरात गायल्याने धर्म थोडेच बदलतो, पाकच्या गुलाम अलींचे मनोगत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाराणसी - मी.., बनारस. माझ्या धमन्यांत न जाणो किती रस वाहत आहेत. गंगेच्या कुशीतून निघणार्‍या व मावळणार्‍या सूर्याच्या सौंदर्याचा रस. २३,००० वर मंदिरांत वाहणार्‍या अध्यात्म, परंपरांचा रस. बनारसी पानाचा रस. साहित्य, संगीत-नृत्याचा रस... आता हा उल्लेख झालाच आहे म्हणून सांगतो, संकटमोचन मंदिरात अनेक कलाकार जमले आहेत. येथे गाण्यासाठी पाकिस्तानातून गुलाम अली आलेले आहेत. लोक भले त्यांना परधर्मीय म्हणतील. ते मंदिरात आले म्हणून चकित होतील. पण मला ते माझ्याच परंपरेचे पाईक वाटतात. त्यांना स्वत:ला काय वाटते, जाणूया त्यांच्याच शब्दांतून....

'खासच नाजूक आहे, बनारस... इथले लोकही रेशमासारखे नरम व तलम. तसे मी याआधी दोनदा बनारसला आलो होते. पण संकट मोचनमध्ये गाण्यासाठी ही पहिलीच वारी. येथे गाण्याचे आमंत्रण म्हणजे "उपरवाल्या'चीच कृपा. इतक्या प्रेमाने "याद' केले स्वत:ला रोखू शकलो नाही.

मी कलाकार आहे अन् गाणे माझे काम. मशिदीत गाऊ वा मंदिरात, काय फरक पडतो. हनुमानजींना वाटलं की माझ्याकडून ठुमरी वा चैती ऐकावी, तर मी बापुडा काय करणार. मंदिरात गायल्याने माझा धर्म थोडेच बदलेल. तसेही, संगीत हीच आमची उपासना. संगीताच्या भाषेतूनच आम्ही लोकांशी संवाद साधतो, त्यांच्या मनात घर करतो. सूर व साजाची जादुगरी ही अशीच आहे. अख्ख्या जगात ते एकसारखे ऐकले, समजले जातात. सीमांच्या रेषा त्यापुढे बेमानी ठरतात.मी जमिनीच्या सरहद्दीच्या पलीकडून आलोय, काशीच्या मंदिरात मोहब्बतचा संदेश देण्यासाठी. सूर आणि संगीताने मनांची अंतरे सांधली जाऊ शकतात, हे सांगण्यासाठी...

या मुलखातील लोकांचे प्रेम मला येथे वारंवार खेचून आणते. गेल्या ३५ वर्षांपासून या देशी येतोय. मी सीमेपल्याडचा आहे, हे कधीही जाणवले नाही. विश्वास ठेवा, येथून पलीकडे जाणारे लोक याच भावनेने परततात.

एक इच्छा होती की, बनारसचे प्रतिनिधित्व करणारे वजीर-ए-आझम नरेंद्र मोदींनीही माझे गायन ऐकले असते. मात्र व्यग्रतेमुळे ते येणार नसल्याचे कळाले. खैर, पुन्हा कधी...'