जम्मू - पोलिसांच्या मदतीने लष्कराने केलेल्या संयुक्त कारवाईत दोडा जिल्ह्यात दोन वेगवेगळे अतिरेकी अड्डे उद्ध्वस्त केले. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा, दारूगोळा जप्त करण्यात आला. याशिवाय एका अड्ड्यावरून लष्कर-ए-तोयबा या अतिरेकी संघटनेची कागदपत्रे, पाकिस्तानच्या सियालकोट येथे छापलेली पुस्तके जप्त करण्यात आली.
एक चिनी बनावटीचे पिस्तूल, दोन काडतुसे, दोन एके काडतुसे असा साठाही हाती लागला. दुसऱ्या एका पथकाने रनतसाका जंगलातील अड्डा उद्ध्वस्त केला. दरम्यान, पाकिस्तानने शुक्रवारी आरएसपुराच्या अरनिया सेक्टरमध्ये पुन्हा भारतीय चौक्यांवर रात्रभर गोळीबार केला. भारतानेही त्याला चोख प्रत्युत्तर दिले.
अक्षय गोडबोले शहीद
पूंछच्या मेंढर सेक्टरमध्ये बलनोई भागात लष्कराच्या गस्तीवरील पथकावर हल्ला चढवण्यात आला. यात अक्षय गोडबोले हा जवान घटनास्थळीच शहीद झाला. यात शुभम खडतकर गंभीररीत्या जखमी झाला आहे. उपचारासाठी त्याला राजौरीच्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे.