आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत बांधतोय एलओसीवर भिंत, पाकला धडकी, UN कडे केला कांगावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संयुक्त राष्ट्रे- नियंत्रण रेषेवर (एलओसी) भारत बांधत असलेल्या भिंतीवरून पाकिस्तानच्या उरात धडकी भरली आहे. पक्की आंतरराष्ट्रीय सीमा उभारण्याचा भारताचा मनसुबा असल्याचा कांगावा पाकने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेकडे केला आहे. पाकच्या या आगळिकीमुळे उभय देशांदरम्यानच्या शांतता बोलणीला फटका बसू शकतो. पाकच्या या कांगावेखोरपणाला योग्य वेळी उत्तर देऊ, असा तडाखेबंद पवित्रा भारताने घेतला आहे.

संयुक्त राष्ट्रांतील पाकच्या राजदूत मलिहा लोधी यांनी ४ व ९ सप्टेंबर रोजी सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष रशियन राजदूत विताली चुर्किन यांच्याकडे यासंबंधी पत्रे पाठवली आहेत. जम्मू-काश्मीर व पाकिस्तानदरम्यानच्या १९७ कि.मी. एलओसीवर १० मीटर उंच व १३५ फूट रुंदीची भक्कम भिंत बांधण्याचा भारताचा इरादा असल्याचे लोधी यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानची दोन्ही पत्रे परस्परविरोधी असल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता विकास स्वरूप यांनी म्हटले आहे. ४ रोजीच्या पत्रात कोणतीही द्विपक्षीय चर्चा झाली नसल्याचे म्हटले आहे. वास्तविक बीएसएफ व पाक रेंजर्समध्ये चर्चा झाली आहे.
तसेच ९ सप्टेंबर रोजीचे मलिहा यांचे पत्र हिज्ब-उल-मुजाहिदीनचा म्होरक्या सईद सलाहुद्दीनच्या वक्तव्यावर आधारित आहे. सईदला आम्ही अतिरेकी मानतो. त्यामुळे या मुद्द्यावर पाकला योग्य वेळी उत्तर दिले जाईल, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता विकास स्वरूप यांनी म्हटले आहे.