आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Celebrated Beating Retreat Without India

भारताला चुकवून पाकने साजरा केला बीटिंग रिट्रीट, वाघा सीमेवर कसून तपासणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : वाघा सीमेवर झालेल्या स्फोटानंतर सोमवारी या भागातून नागरिकांची ये-जा सुरळीत होती. मात्र, प्रत्येकाची कसून तपासणी केली जात होती.
अमृतसर/नवी दिल्ली/लाहोर - वाघा सीमेजवळ झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर तीन दिवस पारंपरिक बीटिंग रिट्रीट सोहळा रद्द करण्याच्या निर्णयाला फाटा देत पाकने भारताला चुकवून सोमवारी हा सोहळा ऐनवेळी साजरा केला. सीमेवर दोन्ही देशांचे ध्वज उतरवताना हा सोहळा साजरा करण्याची परंपरा आहे.

दुखवटा म्हणून तीन दिवस हा सोहळा रद्द करण्याचे दोन्ही देशांनी ठरवले होते. मात्र, ऐनवेळी पाकिस्तानी रेंजर्सकडून निरोप आला. इतक्या कमी वेळेत तयारी अशक्य असल्याने भारतीय सैनिकांनी फक्त औपचारिकता पूर्ण केली.

५५ वर्षांत प्रथमच : वाघा सीमेवर गेल्या ५५ वर्षांत कधीच हा सोहळा रद्द करण्यात आलेला नाही. १९७१ आणि नंतर कारगिल युद्धकाळातही हा सोहळा सुरूच होता. मात्र, सोमवारी पाकिस्तानच्या तिरक्या चालीमुळे हा सोहळा होऊ शकला नाही.

पाकिस्तानकडून नारेबाजी : या सोहळ्याला शेकडोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या पाकिस्तानी नागरिकांनी सोहळा सुरू असताना जोरदार नारेबाजी केली.
भारताच्या हद्दीत मात्र शुकशुकाट : भारतीय हद्दीत या सोहळ्यासाठी रोज सरासरी २० हजार लोक उपस्थित असतात. मात्र, सोमवारी येथे शुकशुकाट होता. फक्त सीमा सुरक्षा दलाचे जवान या वेळी उपस्थित होते. प्रवेशद्वाराजवळ असलेली दुकानेही बंद होती. जे थोडे लोक येथे दाखल झाले त्यांनाही जवानांनी दूरच रोखून धरले.

पाकला पाच दिवसांपासून माहिती होती : पाकिस्तानी गृह विभागाच्या एका अधिका-यानुसार या आत्मघाती हल्ल्याची पाच दिवसांपूर्वीच गुप्तचरांना माहिती मिळाली होती. तरीही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली नाही. भारतीय सीमा सुरक्षा दलानेही याबाबत पाकिस्तानी अधिका-यांना इशारा कळवला होता.

मृतांत १० महिला ८ मुलांचा समावेश
रविवारी सायंकाळी ध्वज उतरवण्याच्या पारंपरिक समारंभानंतर पाक हद्दीत झालेल्या भयंकर आत्मघाती स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ६१ झाली आहे. समारंभाला उपस्थित राहून हे लोक परतत असताना दहशतवाद्याने स्वत:ला उडवून दिले. या प्रकरणी सुरक्षा संस्थांनी आतापर्यंत २० जणांना अटक केली आहे. मृतांमध्ये १० महिला, ८ मुले व २ सुरक्षा जवानांचा समावेश आहे. या स्फोटात १०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

परेड स्थळच होते टार्गेट
पंजाब प्रांताचे गृहमंत्री कर्नल शुजा खानजादा यांच्यानुसार हल्लेखोराचे लक्ष्य ध्वजारोहण स्थळच होते. हा आत्मघाती परेड स्थळावर पोहोचण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, अपयशी ठरल्यावर त्याने मुख्य प्रवेशद्वारावरच स्फोट घडवला.

‘तो’ वाघा बॉर्डरवरच राहत होता...
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आत्मघाती हल्लेखोराचे वय अवघे २० वर्षांचे होते. तो वाघा सीमेच्या परिसरातच वास्तव्यास होता. प्रारंभिक चौकशीत हाती आलेल्या माहितीनुसार हा स्फोट घडवून आणणारे मास्टरमाइंड पण स्फोटाच्या वेळी या परिसरात होते. हल्लेखोराच्या शरीराचे अवयव एकत्र करून त्याची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याची डीएनए चाचणी केली जाईल.

हल्लेखोर इथवर पोहोचलाच कसा?
वाघा सीमेवर विशेषत: ध्वजारोहण होते त्या भागांतील चौक्यांवर कडेकोट बंदोबस्त असतो. प्रत्येकाची येथे कसून तपासणी होते. तरीही हा हल्लेखोर स्फोटकांसह प्रवेशद्वारापर्यंत पोहोचलाच कसा, हा प्रश्न दोन्ही देशांतील सुरक्षा संस्थांना पडला आहे. १५ ते २० किलो स्फोटके पाठीवर लादून एक दहशतवादी प्रवेशद्वारापर्यंत पोहोचत असेल तर सीमेवरील सुरक्षेत किती उणिवा आहेत हेच यावरून सिद्ध होते.