आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Challenges Lakhvi's Bail In Supreme Court

झकी उर रेहमान लखवीच्या जामीनाला पाकिस्तान सरकारने दिले सुप्रीम कोर्टात आव्हान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मुंबईवर झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्याची प्रमुख आरोपी झकी उर रेहमान लखवी याला मिळालेल्या जामीनाला पाकिस्तान सरकारने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाने या जामीनाच्या विरोधात याचिका दाखल केली आहे.

लश्कर ए तोयबाचा कमांडर असलेल्या झकी उर रेहमान लखवीला पाकिस्नाता 18 डिसेंबर रोजी जामीन मंजूर झाला होता. त्यानंतर त्याला पाकिस्तान सरकारने पुन्हा ताब्यात घेतले होते. पण इस्लामाबाद हायकोर्टाने लखवीला सोडण्याचे आदेश दिले. त्यानंतर मंगळवारी पुन्हा एकदा एका नव्या प्रकरणामध्ये लखवीला पोलिसांनी अटक केली. लखवीला एका व्यक्तीच्या अपहरणाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

लखवीला सोडण्याच्या निर्णयाची बातमी आल्यानंतर भारताने पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त यांच्याकडे तक्रार नोंदवत लखवीला मोकळे सोडण्याबाबत सोमवारी आक्षेप नोंदवला होता. लखवी याला दहा लाख रुपयांच्या बाँडवर जामीन मंजूर करण्यात आला होता. पण रावळपिंडीच्या तुरुंगातून सुटण्याआधीच त्याला परत अटक करण्यात आली होती.

लखवी हा 2009 पासून रावळपिंडी येथील तुरुंगात अटकेत होता. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात लखवीच्या विरोधात सबळ पुरावे नसल्याचे सांगत कोर्टाने त्याला जामीन मंजूर केला होता. मुंबईवरील हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानात सात जणांच्या विरोधात खटला सुरू आहे. लखवी हा त्यांच्यापैकी एक आहे. भारताने पाकिस्तानला या सर्वांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर पुरावेही दिले होते. पण सुनावणीत मात्र त्यांच्याविरोधात काहीही समोर येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे दहशतवादाच्या बाबतीत पाकिस्तानच्या भूमिकेवर भारताने वारंवार आक्षेप नोंदवला आहे.