आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय सरहद्दीवर पाकिस्तानचा गोळीबार, सलग दोन वेळा युद्धबंदी मोडली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू, इस्लामाबाद - जम्मू-काश्मिरातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी फौजांनी गोळीबार करून पुन्हा युद्धबंदी मोडली. युद्धबंदी मोडण्याची गेल्या 24 तासांतील ही दुसरी वेळ आहे. शरीफ सरकार सत्तारूढ झाल्यानंतर दोनच दिवसांनी ही युद्धबंदी मोडण्यात आली, तर दुसरीकडे भारतीय विमानांनी पाकिस्तानी हवाई क्षेत्रात घुसखोरी केल्याचा आरोप पाकि स्तानने केला आहे.


विजेसाठी भारताशी बोलणी सुरू असतानाच पाकिस्तानने सरहद्दीवर गोळीबार करून युद्धबंदी मोडली आहे. मंगळवारी दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक पुंछ जिल्ह्यातील नांगी तिकरी भागात भारतीय चौक्यांच्या दिशेने पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार केला. तासभर अंदाधुंद गोळीबार सुरू होता. या गोळीबारात कुणीही जखमी झाले नाही. भारतीय जवानांनीही तत्काळ चोख प्रत्त्युत्तर दिल्याचे संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले. दरम्यान, भारतीय जेट विमानांनी पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात घुसखोरी केल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. पंजाब प्रांतातील पाकपट्टन जिल्ह्यात भारतीय जेट विमाने तीन नॉटिकल मैलापर्यंत घुसली होती, असे पाकिस्तानी अधिका-यांनी सांगितले, परंतु अधिकृतरीत्या पाकने याप्रक रणी निषेध नोंदवलेला नाही. त्यामुळे भारतीय विमानांनी हवाई क्षेत्र भंग केल्याचा पाकिस्तानचा कांगावाच असण्याची शक्यता आहे.


हवाई क्षेत्राचा भंग केल्याचा कांगावा
दोन मिनिटे घुटमळली
सकाळी 10 वाजून 40 मिनिटांनी दोन भारतीय लढाऊ विमाने फजिल्का सेक्टरमध्ये अट्टारी भागात घुसली. ही विमाने दोन मिनिटे घुटमळली. पाकिस्तानी हवाई दलाने तत्काळ हालचाली केल्याने ही विमाने निघून गेली, असा आरोप पाकने केला आहे.


भारताचे स्पष्टीकरण
जेट विमानांचा सराव सुरू होता. सराव करताना हवाई हद्दीनजीक गेली होती. कदाचित तांत्रिकदृष्ट्या हवाई क्षेत्राचा भंग झाला असेल. पाकिस्तानी अधिका-यांनाही त्याची माहिती देण्यात आली आहे, असे स्पष्टीकरण भारतीय हवाई दलाच्या प्रवक्त्या प्रिया जोशी यांनी दिले.


असा आहे करार
भारत-पाकिस्तान यांच्यात हवाई करार आहे. या करारानुसार दोन्ही देशांच्या लढाऊ विमानांना 10 किलोमीटर अंतरापर्यंत एकमेकांच्या हवाई हद्दीत उड्डाण करता येत नाही.


भारताच्या विजेवर पाकिस्तान उजळणार
इस्लामाबाद - पाकिस्तानचे नवीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी तिस-यांदा पदाची सूत्रे हाती घेताच खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. सुरुवात पंतप्रधान कार्यालयापासून करण्यात आली आहे. कार्यालयातील 30 टक्के कर्मचारी कमी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यासाठी शरीफ सरकारकडून आदेश जारी झाला आहे.


भारताची टीम रवाना
पाकिस्तानातील वीज तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर भारताकडून 500 मेगावॅट एवढा वीजपुरवठा करण्याची योजना आहे. त्यासाठी भारतातील तज्ज्ञ टीम सोमवारी पाकिस्तान दौ-यावर रवाना झाली आहे. ट्रान्समिशनच्या माध्यमातून मैत्रीचे नवे पर्व सुरू होण्याची आशा आहे. ऊर्जा विभागाच्या संयुक्त सचिव रिता आचार्य यांच्या नेतृत्वाखालील टीम सोमवारी (10 जून) पाकिस्तानला रवाना झाली आहे. त्यांचा हा दौरा तीन दिवसांचा आहे. या दौ-यात टीम पंजाबचे (पाकिस्तान) मुख्यमंत्री मोहंमद शाहबाज शरीफ यांच्याशी टीमची चर्चा होणार आहे. वीज निर्मितीसाठी आवश्यक असणा-या मूलभूत गोष्टींवर सविस्तर चर्चा या भेटीत होणार आहे. पंजाबच्या काही भागाला ही वीज पुरवली जाणार आहे. राज्याच्या वीज क्षमतेत 1000 मेगावॅटने वाढ करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. त्याअंतर्गत भारताकडून वीज घेण्याची ही योजना आहे.