आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतीय रुग्णाला पाकिस्तानी डॉक्टरांकडून जीवदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमृतसर - भारत - पाकिस्तान संबंधांमधील तणाव नेहमीच चर्चेत असतो, परंतु दोन्ही देशांमध्ये सौहार्द संबंध प्रस्थापित करणा-या घटनाही घडत असतात. 24 जून रोजी भारतीय प्रवाशाला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर पाकिस्तानी डॉक्टरांनी तत्परता दाखवत त्यांच्यावर उपचार करून त्यांचे प्राण वाचवल्याची घटना घडली.
दोन्ही देशांदरम्यान ‘फ्रेंडशिप’चे अनुबंध घट्ट करणारी ही घटना थोडीशी उशिरा जगजाहीर झाली. परंतु त्यातून जपले गेलेले मानवतेचे नाते नजरेआड करता येत नाही. या घटनेशी संबंधित कराची येथील डॉ. झेड. ए. हुसेन यांनी दैनिक ‘भास्कर’ला याची माहिती दिली. तसेच भारतीय परराष्‍ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता सय्यद अकबरुद्दीन यांनीही या घटनेला दुजोरा दिला आहे.
ठाणे जिल्ह्यात राहणारे येथील 76 वर्षीय नागरिक वसंत बोंडाळे हे युरोपचे पर्यटन करून तुर्की एअरलाइन्सच्या टीके 720 या विमानाने इस्तंबूलहून मुंबईला येत होते. अचानक त्यांच्या छातीत कळ येऊ लागली. त्यांची पत्नी नीलिमा यांनी तातडीने याची माहिती पायलटला दिली. पायलटने घटनेची माहिती देऊन डॉक्टरी सेवेची गरज असल्याची घोषणा केली. सुदैवाने कोल्हापूरचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सुधान भाटे विमानात उपस्थित होते. त्यांनी बोंडाळे यांना प्रथमोपचार करून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. त्या वेळी विमान पाकिस्तानी हवाई हद्दीत पोहोचले होते.
पायलटने संदेश पाठवून मेडिकल इमर्जन्सी लँडिंगची परवानगी मागितली. परवानगी मिळाल्यानंतर विमान कराची विमानतळावर उतरवण्यात आले. नलिनी यांच्या मनात शंका आली की व्हिसा, परमिटशिवाय पाकिस्तानात कसे उतरणार? आपल्याला विमानतळावरच रोखून धरले जाणार नाही ना? परंतु तेथे डॉक्टरांचे पथक अ‍ॅम्ब्युलन्ससह आधीपासूनच तैनात होते. जराही वेळ न दवडता बोंडाळे यांना आगा खान युनिव्हर्सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे पाक डॉक्टरांनी त्यांच्यावर आवश्यक उपचार सुरू केले. तसेच नलिनी यांना चिंता करण्याचे कारण नाही, असे सांगत धीर दिला. तसेच त्यांच्या निवासाची व्यवस्थाही केली.


पाकिस्तानात परकेपणा जाणवलाच नाही
बोंडाळे यांना 15 दिवस कराचीच्या रुग्णालयात राहावे लागले. या काळात आम्हाला कधीही परकेपणा जाणवला नाही. आम्ही दुस-या कोणत्या देशात नव्हे तर भारतातच आहोत, असे आम्हाला वाटले. 11 जुलै रोजी हे दांपत्य पाकिस्तानी एअरलाइन्सच्या विमानाने भारतात परतले. अमृतसरच्या एस्कॉट रुग्णालयाचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. डी. एम. सैनी यांनी सांगितले की, हजारो पाकिस्तानी नागरिक उपचारासाठी आपल्या देशात येतात. बरे होऊन परत जातात, परंतु या एका घटनेने पाकिस्ताननेही त्यांच्यातील माणुसकीचे दर्शन घडवले आहे.