आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistani Prisoner Sanaullah Ranjyala Death In Chandigargh

पाकिस्तानी कैदी सनाउल्लाह रंजयलाचा मृत्यू, भारत मृतदेह पाककडे देणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदीगड /नवी दिल्ली - भारतीय तुरुंगात कैद असलेला पाकिस्तानी कैदी सनाउल्लाह रंजयलाचा गुरुवारी सकाळी चंदीगडमधील रूग्णालयात मृत्यू झाला. तीन मे रोजी सनाउल्लाहवर जम्मूमधील कोट भलवाल तुरुंगात हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर त्याला तत्काळ चंदीगडमधील पीजीआय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, सनाउल्लाहचा मृतदेह पाकिस्तानने मागितला असून, या प्रकरणाची चौकशी आंतरराष्ट्रीय पातळीवर व्हावी, अशी मागणी केली आहे. यावर सनाउल्लाहचे पोस्टमॉर्टम केल्यानंतर त्याचा मृतदेह पाकिस्तानात पाठवला जाणार आहे. भारताने तसे संकेत दिले आहेत.

सनाउल्लाहच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. तसेच त्याला कावीळ झाला होता. त्याचा उच्चरक्तदाबही स्थीर नव्हता. त्यामुळे त्याची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती. उपचाराला तो प्रतिसाद देत नव्हता, असे वैद्यकीय सूत्रांन‍ी सांगितले.

भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्त सलमान बशीर यांनी सोमवारी रुग्णालयात जाऊन सनाउल्लाहची भेट घेतली होती. सनाउल्लाहची जिवंत राहण्याची शक्यता कमीच असल्याचेही त्यांनी सांगितले होते. सन 1999 पासून सनाउल्लाह भारतीय तुरुंगात कैद होता. भारतीय नागरीक सरबजीत सिंगच्या मृत्यूनंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध पुन्हा एकदा ताणले गेले होते. परंतु अशा परिस्थितीत संयम पाळला पाहिजे, असे बशीर यांनी सांगितले होते. सनाउल्लाह हा पाकिस्तानातील सियालकोट शहरातील रहिवासी होता. त्याची पत्नीचे सात वर्षांपूर्वी निधन झाले होते.

दरम्यान, शिक्षेचा कालावधी बाकी असल्याने त्याला मायदेशी पाठवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने पाकिस्तानी कैद्याला मायदेशी पाठवण्याच्या मागणीला फेटाळून लावले आहे. वर जम्मू तुरुंगात झालेला हल्ला रोखण्यासाठी पावले का उचलली नाहीत, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी केंद्र व राज्य सरकारकडे केली. सनाउल्लाह शिक्षेचा कालावधी संपलेला नसल्यामुळे त्याचे पाकिस्तानमध्ये प्रत्यार्पण करण्याची मागणी फेटाळण्यात आली. सनाउल्लाह वर 3 मे रोजी झालेला हल्ला रोखण्यासाठी का पावले उचलली नाहीत, असे न्या. आर. एम. लोढा यांच्या खंडपीठाने म्हटले आहे. या प्रकरणाला जबाबदार तुरुंग अधिकार्‍यांची व सुरक्षेची माहिती मागण्यात आली.