आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाक सैन्याचा काश्मीरमध्ये पुन्हा गोळीबार; शाळांनाही केले लक्ष्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू- पाकिस्तानने बुधवारी सकाळी काश्मीरच्या अनेक गावांवर आणि भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. पूंछ आणि राजौरीमध्ये त्यांनी उखळी तोफगोळ्यांचा वर्षाव केला. यात एक व्यक्ती जखमी झाली. भारतीय सैन्यानेदेखील याचे सडेतोड प्रत्युत्तर दिले. यापूर्वी सोमवार आणि मंगळवारीदेखील गोळीबार केला होता. पाकिस्तानने राजौरीमध्ये शाळांवरदेखील उखळी तोफांनी हल्ला केला. गेल्या दोन दिवसांत ३ जवान शहीद आणि एका ९ वर्षीय मुलीचा बळी गेला. पाकिस्तानच्या गोळीबारामुळे सीमेलगतच्या परिसरातील ८००० लोकांना झळ बसली.  

संरक्षण प्रवक्त्याने सांगितले की, पाकिस्तानी सैन्याने भिम्बर गल्ली सेक्टरच्या नौशहरामध्ये सकाळी अंदाजे पावणेनऊ वाजता भारतीय सैन्याच्या चौक्यांवर विनाकारण गोळीबार सुरू केला. भारतानेदेखील याचे सडेतोड प्रत्युत्तर दिले. दरम्यान, पाकिस्तानने दावा केला आहे की, शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्यानंतर त्यांचे २ जवान मारले गेले. त्यांनी इस्लामाबादमध्ये भारताचे कनिष्ठ राजदूत जे.पी. सिंह यांना समन्स धाडून हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.  

कोणत्या क्षेत्रांना केले लक्ष्य?  
पाकिस्तान सैन्याने राजौरी आणि पूंछ जिल्ह्यातील बालाकोट, धार, लाम्बीबारी, राजधानी, मानकोट आणि सांदोत येथे उखळी तोफगोळ्यांचा मारा केला. पोलिसांनी सांगितले की, सांदोत गावात नियंत्रण रेषेजवळ गोळीबार केला. यात स्थानिक रझा नामक व्यक्ती जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  

गेल्या महिन्यात २३ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन  
जूनमध्ये पाकिस्तानने २३ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. याच महिन्यात पाकच्या  बॅटने (बॉर्डर अॅक्शन टीम) गस्तीवर असलेल्या भारतीय जवानांवर हल्ला केला. गेल्या महिन्यात २ वेळा दहशतवाद्यांनी भारतीय सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. या सर्व घटनांत भारताचे ३ जवान शहीद झाले. एका नागरिकाचा बळी गेला. १२ जण जखमी झाले.

२ दिवसांत ८००० नागरिकांना झळ  
गेल्या २ दिवसांत पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात ८००० पेक्षा अधिक नागरिकांना झळ बसली आहे. यात नौशहरातील ३००० आणि मांजाकोट, राजधानी, पंजग्रेन, नायका येथील ५००० नागरिकांचा समावेश आहे. सैन्यदलाने राजौरी जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या गोळीबारातून २१७ विद्यार्थी आणि १५ शिक्षकांची सहीसलामत सुटका केली.  
बातम्या आणखी आहेत...