आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनच्या पारछू सरोवराचा आकार वाढला, हिमाचलला मोठा धोका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिमला - वाढत्या पाणीपातळीमुळे 2005 मध्ये हिमाचलमध्ये हाहाकार माजवणार्‍या पारछू सरोवराने पुन्हा एकदा धोक्याची पातळी गाठली आहे. सरोवराच्या भिंतीला तडे गेल्यास सतलज नदीकाठच्या सुमारे 24 गावांमध्ये धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते. चीनच्या तिबेटमध्ये असलेल्या पारछू सरोवराचे आकारमान 34 हेक्टरवरून थेट 100 हेक्टरपर्यंत वाढले आहे. सरोवरात बाहेरून येणार्‍या प्रवाहाचा वेग जास्त असून या पाण्याचा विसर्ग जास्त प्रमाणात होत नाही. यामुळे सरोवरातील पाण्याची पातळी वाढली ते परिसरात इतरत्र पसरत आहे.

केंद्रीय जल आयोगाचे विभागीय संचालक ग्यांबा दोर्जे यांनी सांगितले की, सरोवराचे आकारमान वाढले असून पाण्याचा अपेक्षित प्रमाणात विसर्ग होत नाही. आम्ही हैदराबादच्या नॅशनल रिमोट सेसिंग संस्थेला याबाबत कळवून याकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे. तसेच आम्हीही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. हिमाचल प्रदेश सरकारसुध्दा पारछू सरोवराच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. आपत्ती व्यवस्थापक समन्वयक अमनदीप गर्ग यांनी सांगितले की, जास्त काळजी करण्याचे कारण नसून सरोवराच्या स्थितीवर नियमितपणे पाळत ठेवली जात आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचेही याकडे लक्ष असून सरोवराबाबतचा अहवाल ते दररोज घेत आहेत.


चीनकडून मदत नाही
2006 मध्ये याप्रकरणाबाबत चर्चेसाठी गेलेल्या भारतीय शिष्टमंडळाला सरोवराबाबतची सर्व माहिती दिली जाईल, असे आश्वासन चीनने दिले होते. पण त्याचे पालन केले नाही. सरोवराच्या सद्यस्थितीबाबत चीनकडून अद्याप कोणतीही सूचना भारतास देण्यात आलेली नाही.

भूस्खलनामुळे सरोवर तयार
तिबेटमध्ये वाहणार्‍या पारछू नदीवर 2004 मध्ये झालेल्या भूस्खलनामुळे हे सरोवर तयार झाले आहे. पारछू नदीचे पाणी स्पीती नदीला येऊन मिळते आणि नंतर ही स्पीती नदी किन्नौरमध्ये सतलजच्या प्रवाहात मिसळते.

सॅटेलाइटवरून मिळाले चित्र
हिमनग वितळल्यामुळे पारछू नदीवरील या सरोवरात मागील एका महिन्यात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा जमा झाला आहे. या सरोवराचे आकारमान वाढले असल्याचे रिमोट सेंसिंग सॅटेलाइटद्वारा 15 जुलैला घेण्यात आलेल्या छायाचित्रातून दिसून आले आहे. आकारमानात वाढ झाल्यामुळे सतलज नदीकाठचे लोक भयभीत आहेत. 2005 मध्ये पारछू सरोवराच्या भिंतीला तडे गेल्यामुळे आलेल्या पुरामुळे मोठे नुकसान झाले होते.