आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चित्रपटांचा भूतकाळ जागवणारी कॅमेऱ्यांची न्यारी दुनिया

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी : गतकाळात ज्यांच्यामुळे चित्रपट पडद्यावर अवतरले अशा दुर्मिळ कॅमेऱ्यांच्या संग्रहातून चित्रपट गावोगावी पोहोचवण्याचा निर्धार गोमंतकीय कलाकार लॉरेन्स विल्सन यांनी केला आहे. यासाठीच ते गावोगावी कॅमेऱ्यांचे प्रदर्शन भरवत असतात. आतापर्यंत देशभरातील अनेक चित्रपट महोत्सवांत त्यांच्या या प्रदर्शनाने लाखो कलाकार, प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे.
४७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही त्यांनी हे प्रदर्शन भरवले आहे. त्यास देश-विदेशातील कलाकारांसोबतच भारतीय चित्रपटातील क्षेत्रातील कलाकार, दिग्दर्शक आणि अन्य मंडळी आवर्जून भेट देत आहेत. विल्सन यांच्या संग्रहात सध्या ८ एमएम, १६ एमएमच्या अत्यंत दुर्मिळ कॅमेऱ्यासोबतच अनेक प्रकारचे प्रोजेक्टरही आहेत. ही सर्व उपकरणे गतकाळातील आठवणींचा ठेवा आहे.
आवड अभिनयाची, बनले तंत्रज्ञ : ७० च्या दशकात विल्सन यांनी मायानगरीची वाट धरली. अभिनयाची आवड त्यांना शांत बसू देत नव्हती. काही छोटमोठ्या संधी मिळाल्या. भगवानदादा यांच्यासोबत त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. मात्र, त्यांच्या निधनानंतर विल्सन पडद्यापासून दुरावले. मात्र, तंत्रज्ञानाच्या ज्ञानाने त्यांना पडद्यामागच्या विश्वात पोहोचवले. प्रोजेक्टर ऑपरेटर म्हणून अनेक वर्षे काम केल्यानंतर ते कॅमेरा, प्रोजेक्टर व चित्रपटांशी संबंधित वस्तूंच्या संग्रहाकडे वळले.
श्रीराम लागू, निळू फुले अादींच्या आठवणींचा खजिना
मुळात गोव्यातील काले सांगे येथे राहणारे लॉरेन्स विल्सन यांनी राजेश खन्ना, भगवानदादा, श्रीराम लागू आणि निळू फुले यांच्या छत्रछायेखाली तब्बल दोन दशकांपर्यंत काम केले. त्यांच्याशी संबंधित अनेक आठवणी त्यांनी छायाचित्रांच्या रूपात जपल्या आहेत. विविध नाटकांच्या प्रयोगाच्या निमित्ताने या कलाकारांनी गावोगावी दिलेल्या भेटीदरम्यानचे प्रसंग या छायाचित्रातून उलगडतात. विल्सन सध्या या आठवणीही लोकांपर्यंत पोहोचवत आहेत.
संग्रहात दुर्मिळ कॅमेरा, प्रोजेक्टरचा समावेश : विल्सन यांच्या संग्रहात १९८० पूर्वीच वापरातून बाद झालेला ८ एमएमचा कॅमेरा, आवाज नसलेला १६ एमएमचा कॅमेरा, तंबू किंवा यात्रेत चित्रपट दाखवण्यासाठी वापरला गेलेला ३५ मिमीचा पोर्टेबल प्रोजेक्टर, स्लाइड प्रोजेक्टर आदी अनेक दुर्मिळ अशा उपकरणांचा समावेश आहे.
बातम्या आणखी आहेत...