आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अत्याचार झाल्याचे १२ वर्षीय मातेलाच न्यायालयात सिद्ध करावे लागणार!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - ती अत्याचारपीडित आहे, पण निर्भया नाही. ती दलित आहे, पण रोहित वेमुला नाही. अशा प्रकरणांपेक्षा तिचे प्रकरण गंभीर आहे, पण कोणीही ते उपस्थित केले नाही. ना संसदेत, ना रस्त्यावर. कारण ती ‘एकटी’ आहे, १२ वर्षांची आहे, दलित आहे. विवाह न होताच आई झाली आहे. गावातीलच एका युवकाने तिच्यावर अत्याचार केला, असा आरोप आहे. बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातील हाजीपूर-बाजितपूर धरणाच्या वर गंगा नदीच्या तीरावरील भागात तिच्यावर अत्याचार झाला. त्या दिवशी ती वडिलांसाठी जेवण घेऊन नौकेने दुसऱ्या तीरावर गेली होती. वडील गव्हाची कापणी करत होते. आरोपीला अटक झाली. जुवेनाइल जस्टिस बोर्डात त्याने आरोप नाकारले.

न्यायालयात वेळेवर आरोपपत्र दाखल झाले नाही. आरोपी जामिनावर सुटला. या वयात ‘एकटी’ची (काल्पनिक नाव) अशी अवस्था कोणी केली? खेळण्या-बागडण्याच्या वयात तिच्यावर मातृत्व कोणी लादले? तिला न्याय मिळेल का? हे प्रकरण पाहणारे बाल कल्याण समितीचे समस्तीपूरचे अध्यक्ष तेजपाल सिंह म्हणाले, ‘सत्य समोर येईलच.’ मुलगा आरोप नाकारत आहे. तेजपाल यांच्यानुसार, मुलाने मान्य केले नाही तर आम्ही डीएनए चाचणी करू. मुलगी सध्या आमच्या संरक्षणात आहे. आम्ही या प्रकरणाचा तार्किक निकाल लावू. ‘एकटी’ अशिक्षित आहे. चर्चेत ती फक्त हो, नाही अशी उत्तरे देते. मान खाली घालून. आता ती जास्त बोलत नाही. डीएनए चाचणी म्हणजे काय हेही तिला माहीत नाही. तिच्या बोलण्यावर कोणाचाही विश्वास नाही. अत्याचार झाला, आरोपीच तिच्या मुलाचा बाप आहे हे तिलाच सिद्ध करावे लागेल. चाचणीसाठी नमुने, आरोपी आणि तिच्या मुलाला नेले जाईल. मग सुरू होईल अत्याचारापेक्षाही जास्त वेदनादायक असह्य प्रक्रिया. निकाल येईपर्यंत रोज अत्याचाराप्रमाणे. दिल्ली उच्च न्यायालयातील सरकारी वकील कृष्णनंदन कुमार म्हणाले की, हे वेगळे प्रकरण आहे. ती स्वत:च्या पायावर उभी राहावी यासाठी सरकारने तिला कौशल्य प्रशिक्षण द्यावे. तरुण होईपर्यंत मुलाच्या सांभाळाची जबाबदारीही सरकारलाच घ्यावी लागेल.

सध्या ही मुलगी आपल्या मुलासह निशांत गृहात आहे. अगदी चूप. तिच्या आईचा वर्षभरापूर्वी मृत्यू झाला आहे. तोही बाळंतपणातच. वडील मंदबुद्धी आहेत. ते गावातच मजुरी करतात. तीन भाऊ-बहिणींत ‘एकटी’ सर्वात मोठी आहे. धाकटी बहीण सहा वर्षांची आहे. भाऊ चार वर्षांचा. कुटुंब झोपडीत राहते. संपत्ती म्हणाल तर चूल आणि अॅल्युमिनियमची काही भांडी. तेथेच देवघर. तेथे शंकर-पार्वतीची मूर्ती आहे. ‘एकटी’ची काकू सांगते की, मुलगी चांगली हिंडत-खेळत होती. एक दिवस तिने पोटात दुखत असल्याची तक्रार केली. आम्ही तिला गावातील डॉक्टरांकडे घेऊन गेलो. डॉक्टरने वेगळेच सांगितले. मुलीला विचारले तेव्हा तिने घाबरतच गावातील एका मुलाचे नाव घेतले.
गेल्या वर्षी २१ सप्टेंबरला ठाण्यात गुन्हा दाखल झाला. रुग्णालयात तपासणी केली तेव्हा ती गर्भवती होती. गर्भ पाच महिन्यांचा होता. एफआयआरमध्ये अत्याचार करणाऱ्या आरोपीचे वय १४ वर्षे असे आहे. पोलिस तपासात शाळेतील ४ मे १९९८ या जन्मतारखेच्या आधारावर तो १७ वर्षांपेक्षा जास्त वयाचा निघाला. पोलिसांनी १५ ऑक्टोबरला अंतिम आरोपपत्र दाखल केले.

आरोपीवर अत्याचार, पॉस्को, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची सर्व कलमे लावली आहेत. ही कलमे लावली तरी आरोपीला २२ सप्टेंबर २०१५ ला जामीन कसा मिळाला, असा प्रश्न आहे. त्यावर जुवेनाइल जस्टिस बोर्डाचे सरकारी वकील देवनारायण म्हणतात की, आरोपीला दंड संहिता प्रक्रियेच्या कलम १६७ (२) चा फायदा झाला. म्हणजे सुनावणी करणाऱ्या न्यायालयात आरोपपत्र ९० दिवसांच्या आत दाखल झाले नाही. उशीर का झाला, असा प्रश्न २८ मे रोजी एका बैठकीत उपस्थित झाला. पोलिस अधीक्षकांनी १ जूनला जिल्हा न्यायाधीशांना पाठवलेल्या उत्तरात म्हटले आहे की, न्यायालयात ७ ऑक्टोबर २०१५ रोजी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते, पण न्यायालयातील ज्या कर्मचाऱ्याने आरोपपत्र स्वीकारले त्याने सुनावणीच्या फाइलमध्ये ते जोडलेच नाही. त्याचा फायदा आरोपीला झाला. दरम्यान ‘एकटी’ आई झाली होती. वैद्यकीय सल्ल्यानुसार तिला २३ जानेवारी २०१६ रोजी पाटण्याला पाठवण्यात आले. २४ जानेवारीला ‘एकटी’ची शस्त्रक्रिया झाली. तिने मुलाला जन्म दिला. आता ज्याने तिची ही अवस्था केली त्यानेच तिला स्वीकारावे, असे तिच्या काकूलाही वाटते. सध्या ती २४ जानेवारी २०१६ पासून निशांत गृहात राहते. सध्या तिचा मुलगा सात महिन्यांचा आहे. ती न्यायाच्या प्रतीक्षेत आहे.

पुढे वाचा, चाचणी नव्हे, मुलीचा जबाब पुरेसा...
बातम्या आणखी आहेत...