आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोरखपूर ट्रॅजेडी - नरेंद्र मोदींची 15 मिनिटे सीएम योगींशी बातचीत; केंद्राने मागवला रिपोर्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोरखपूर - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राज्यातील गोरखपूरच्या सरकारी रुग्णालयातील मेडिकल कॉलेज बाबा राघव दास (BRD)मध्ये 60 मुलांसह 63 मृत्यूंवर केंद्राने राज्य सरकारला रिपोर्ट मागितला आहे. केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांना सरकारने गोरखपूरला पाठवले आहे. त्यांच्यासोबत केंद्रीय आरोग्य सचिवही गोरखपूरला जातील. यादरम्यान नरेंद्र मोदींनी ट्विट करून म्हटले की, या प्रकरणावर माझे लक्ष आहे. मी सातत्याने केंद्र आणि राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. यूपी गव्हर्नमेंटचे अधिकृत सूत्रांनी divyamarathi.comला सांगितले की मोदींनी गोरखपूर प्रकरणावर योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवर चर्चा केली. ही चर्चा 15 मिनिटे चालली.
 
-तत्पूर्वी, या प्रकरणी हॉस्पिटलचे अधिष्ठाता राजीव मिश्रा यांना निलंबित करण्यात आले आहे. उत्तर प्रदेश सरकारने मान्य केले आहे की ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाला होता, मात्र बालकांचा मृत्यू त्यामुळे झाला नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
 
केंद्र सरकारने मागवला अहवाल
केंद्र सरकारने या प्रकरणी राज्य सरकारकडून अहवाल मागवला आहे. केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांना गोरखपूरला पाठवण्यात आले आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशचे आरोग्य मंत्री सिद्धार्थ नाथ सिंह म्हणाले, 'मेडिसकल कॉलेजमध्ये ऑक्सिजन पुरवठा बंद झाला होता. मात्र बालकांचा मृत्यू त्यामुळे झालेला नाही.' मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ शनिवारी म्हणाले, 'या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. कोणत्याही परिस्थितीत दोषींना सुट दिली जाणार नाही.' काँग्रेसने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह आरोग्य मंत्री आणि आरोग्य सचिवांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर संसदीय समितीमार्फत या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.
 
सीएम योगी काय म्हणाले
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, 'रुग्ण इन्सेफेलायटिसमुळे दगावले आहेत. गलिच्छ वातावरणामुळे हा आजार होतो. जे झाले ते चुकीचेच आहे. त्याची चौकशी सुरु आहे. दोषींना सोडले जाणार नाही. का आणि कसे झाले याला आता काही अर्थ नाही. कारवाई होणार आणि निश्चित होणार. जेणे करुन अशा घटना भविष्यात परत घडल्या नाही पाहिजे.'
 
घटनेने पंतप्रधानांना दुःख - अनुप्रिया पटेल 
- केंद्र सरकारने केंद्रीय आरोग्य आणि कुटंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पेटल यांना पाहणीसाठी पाठवले आहे. 
- अनुप्रिया पटेल म्हणाल्या, 'या घटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदींना दुःख झाले आहे. मी तातडीने गोरखपूरला जात आहे.'
- केंद्राने उत्तर प्रदेशचे आरोग्य मंत्री सिद्धार्थ नाथ सिंह आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री आशुतोष टंडन यांच्याकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. 
 
अखिलेश यादवांचा गंभीर आरोप- बालकांच्या कुटुंबियांना मागच्या दाराने काढले
- उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी योगी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. 
- अखिलेश यादव म्हणाले, 'सुरुवातीला सरकारने मृत्यू झाल्याचे मान्यच केले नाही. वास्तविक ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या कंपनीने हॉस्पिटल प्रशासनाला पत्र लिहिले होते. बिल दिले नाही तर पुरवठा बंद करण्यात येईल. त्यामुळे स्पष्ट आहे की ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्याने 30 हून अधिक बालकांचा हकनाक बळी गेला आहे.'
- 'हॉस्पिटलने हे प्रकरण अतिशय वाईट पद्धतीने हताळले आहे. लहान मुलांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे मृतदेह देखील पालकांना त्वरीत देण्यात आले नाही.'
- 'बालकांना आणि त्यांच्या आई-वडिलांना चोरून लपून हॉस्पिटलमधून बाहेर काढण्यात आले. त्यांच्या अॅडमिट कार्डमध्ये हेरफेर करण्यात आला आहे.'
- काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री योगींनी हॉस्पिटलचा दौरा केला होता. ऑक्सिजनची कमतरता असल्याचे त्यांना सांगितले गेले नसेल का? असा सवाल अखिलेश यांनी केला आहे.    
 
किती थकले होते बिल
ऑक्सिजन पुरवठा करणारी गुजरातची कंपनी पुष्पा सेल्सचे 69 लाख रुपयांचे बिल थकल्याने त्यांनी पुरवठा बंद केला होता. पुष्पा सेल्स कंपनीचा दावा आहे की त्यांनी 100 वेळा पत्र लिहिले तरीही बिल दिले गेले नाही. पेमेंटसाठी आल्यानंतर अधिष्ठाता भेटत नसल्याचीही तक्रार त्यांनी केली. त्यामुळे 1 ऑगस्टला वॉर्निंग देऊन 4 ऑगस्टपासून पुरवठा बंद करण्यात आला. बुधवारी ऑक्सिजन टाकी रिकामी झाली, त्यामुळे गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवसांत 63 रुग्णांचा ऑक्सिजन आभावी मृत्यू झाला. विशेष म्हणजे ऑक्सिजन पुरवठा बंद झाला त्याच दिवशी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे बीआरडी मेडिकल कॉलेजची पाहाणी करण्यासाठी आले होते. काँग्रेसने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 
 
मुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा द्यावा
काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद म्हणाले, या घटनेने संपूर्ण देश हळहळला आहे. राज्य सरकारच्या निष्काळजीपणामुळे बालकांचा जीव गेला आहे. शेकडो कुटुंबांवर दुःख कोसळले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आरोग्य मंत्री आणि आरोग्य सचिवांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे. आरोग्य सेवा पुरवणे ही त्यांची जबाबदारी होती. यापासून ते पळ काढू शकत नाही. यात डॉक्टरांचा काहीही दोष नसल्याचेही आझाद म्हणाले. 

काँग्रेसचे राज्यसभेतील विरोधीपक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी आरोप केला की गेल्या एक महिन्यापासून बीआरडी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची कमतरता जाणवत होती. ते म्हणाले, स्थानिक वृत्तपत्रांमध्ये याबद्दल वारंवार छापून येत होते. मात्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. आमच्याकडे याची सविस्तर महिती आहे की हॉस्पिटलमध्ये एक महिन्यापासून ऑक्सिजनची कमतरता होती. 
आझाद यांच्यासोबत उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष राज बब्बर आमि आरपीएन सिंह देखील होते. 
 
बहुजन समाज पक्षाचे नेते सुधींद्र भदोरिया म्हणाले, 'ही फार दुःखद आणि लाजीरवाणी घटना आहे. त्यांना (सीएम योगी आदित्यनाथ) थोडेजरी दुःख होत असेल तर त्यांनी हॉस्पिटलमध्ये जावे आणि मुलांच्या आई-वडिलांना भेटावे. नैतिकेच्या आधारावर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे.'
 
दोषींवर कठोरात कठोर कारवाई होणार
उप मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य म्हणाले, यात जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल. आरोग्य हा राज्य सरकारचा महत्त्वाचा विषय आहे. योग्य कारवाई केली जाईल असा विश्वास मौर्य यांनी शनिवारी व्यक्त केला. 
 
प्रश्नोत्तरातून समजून घ्या योगींच्या राज्यातील मृत्यूचे तांडव
9 ऑगस्ट रोजी योगींनी मेडिकल कॉलेजची पाहाणी केली होती, मात्र ऑक्सिजन पुरवठा बंद असल्याची त्यांना कल्पना नव्हती. दुसरीकडे यूपी सरकारने 26 बालकांसह 63 रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजन पुरवठा बंद पडल्यामुळे झाल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. सरकारने म्हटले आहे, की ऑक्सिजनमुळे मृत्यू झालेले नाही. 
- जिल्हाधिकारी राजीव रौतेला यांनी या घटनेचे न्यायिक चौकशीचे आदेश दिले आहे. ते म्हणाले, शुक्रवारी 7 जणांचा मृत्यू आजारपणामुळे झाला. 
- बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये दोन वर्षांपूर्वी द्रवरुप ऑक्सिजन प्लांट सुरु करण्यात आला होता. येथून 100 खाटांच्या इन्सेफेलायटिस वॉर्डसह 300 रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा केला जातो. 
 
Q. किती मुले दगावली?
A- 1969 मध्ये तयार झालेल्या बीआरडी मेडिकल कॉलेज आणि सरकारी हॉस्पिटलमधील बाल रोग विभागात गेल्या 36 ते 48 तासांत 26 मुलांचा मृत्यू झाला आहे. 
 
Q. मुलांच्या मृत्यूचे कारण काय?
A - 7 मुलांचा मृत्यू इन्सेफेलायटिसमुळे झाला. याला मेंदूपर्यंत ताप पोहोचणेही म्हटले जाते. हे एक व्हायरल इन्फेक्शन आहे. गोरखपूर आणि आसपासच्या परिसरात हा आजार बऱ्याच वर्षांपासून पाहायला मिळतो. लहान मुले याला लवकर बळी पडतात. खूप ताप, वेदना आणि शरीरावच चट्टे येतात. प्रशासनाचा दावा आहे की 25 मुलांचा मृत्यू वेगळ्या कारणाने झाला आहे. 
 
Q. ऑक्सिजन पुरवठा बंद होण्याचे काय प्रकरण?
A- सरकारचा दावा आहे की मुलांसह 63 रुग्णांच्या मृत्यूचे कारण ऑक्सिजन पुरवठा बंद होणे नाही, मात्र मेडिकल कॉलेजमध्ये गुरुवारपासून ऑक्सिजन पुरवठा बंद झाला होता. त्यासाठीची कोणतीही पर्यायी व्यवस्था नव्हती. त्यामुळे गोंधळ उडाला. 
- गुरुवारी सायंकाळी 7.30 वाजता 52 सिलिंडरद्वारे पुरवठा सुरु करण्यात आला. ही खेप रात्री 1 वाजता संपली. रात्री 1.30 वाजता फैजाबाद येथून 50 सिलिंडर मागवण्यात आले. 
- शुक्रवारी सकाळी पुन्हा तारांबळ उडाली. दुपारी 1.30 वाजता गोरखपूर येथील मोदी फार्मा येथून 22 सिलिंडर मागवण्यात आले. 4.30 वाजता 36 सिलिंडर पोहोचले. शुक्रवारी सकाळी रुग्णवाहिकेच्या मदतीने ऑक्सिजन दिले जात होते. 
- गोरखपूर औद्योगिक विकास प्राधिकरण (गीडा), सशस्त्र सीमा दल आणि खासगी हॉस्पिटल्सची मदत घेण्यात आली. 
- हॉस्पिटलच्या रिपोर्टमध्ये मृत्यूची कारणे देण्यात आली आहेत. 
 
Q. यूपी सरकार काय करत आहे?
A- यूपी सरकारने सुरुवातीला दावा केला की एकही मृत्यू ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्याने झालेला नाही. गोरखपूरचे जिल्हाधिकारी म्हणाले, डॉक्टरांचे म्हणणे आहे की ऑक्सिजन नसल्यामुळे मृत्यू झालेला नाही, कारण त्यांच्याकडे पर्यायी व्यवस्था होती. 
 
Q. ऑक्सिजन पुरवठा करणारी कंपनी काय म्हणते?
A- बीआरडी हॉस्पिटलला ऑक्सिजन पुरवठा करणारी गुजरातची पुष्पा सेल्स कंपनी आहे. याचे यूपी डीलर मनीष भंडारी यांनी DivyaMarathi.com ला सांगितले, 'मेडिकल कॉलेजकडे 69 लाख रुपयांचे बिल थकले आहे. आज (शुक्रवार) 22 लाख रुपये मिळाले आहे. उद्या (शनिवार) 40 लाख रुपये मिळणार आहेत. राजस्थानहून एक ट्रक द्रवरुप ऑक्सिजन पाठवण्यात आले आहे. ते आज रात्री (शुक्रवारी रात्री) हॉस्पिटलमध्ये पोहोचेल. या प्रकरणात हॉस्पिटलचे अधिष्ठाता राजीव मिश्रा दोषी आहे, त्यांनी पेमेंट रोखून धरले होते.'
- पुष्पा सेल्स कंपनीने सांगितले की गेल्या 6 महिन्यांपासून बिल थकले होते. पेमेंटसाठी गेल्यानंतर दिवसदिवसभर उभे राहावे लागत होते, तरीही अधिष्ठाता मिश्रा भेटत नव्हते. तीन वर्षांपूर्वी ऑक्सिजन पुरवठा करण्याचे कंत्राट मिळाले होते. कधीही बिल थकले नाही, मात्र गेल्या 6 महिन्यापासून पेमेंटच केला जात नव्हता. 
 

डॉ. कफील खान यांनी आणले सिलिंडर 
रुग्णालयातील डॉ. कफील खान सिलिंडरसाठी वणवण फिरले, आपल्या कारमधून डॉक्टर मित्रांकडून त्यांनी 12 सिलिंडर आणले. 
या संकटात वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी बरीच पळापळ केली. रात्री 2 वाजता इन्सेफेलायटिस वॉर्डाचे प्रभारी डॉ. कफील खान रुग्णालयात आले. सकाळी 7 वाजेपर्यंत अधिकारी, ऑक्सिजन पुरवठादारने फोन न उचलल्यामुळे ते कार काढून बाहेर पडले. खासगी रुग्णालयांना मदत मागितली आणि कारमधून 12 सिलिंडर आणले. कफील यांचा एक कर्मचारी सशस्त्र सुरक्षा दलाचे डीआयजीकडे गेला. त्यावर डीआयजींनी तत्काळ 10 सिलिंडर दिले, सोबत एक ट्रकही दिला. 
बातम्या आणखी आहेत...