आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मिरात सत्ता स्थापनेची परिस्थिती जैसे थे, पीडीपीचे अजूनही मौन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू-काश्मीर - राज्य सरकार स्थापनेची परिस्थिती जैसे थे असून भाजप, पीडीपीकडून कोणतेही संकेत मिळाले नाहीत. पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टी (पीडीपी) यासाठी पुढाकार घेण्याची आपण प्रतीक्षा करत असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले. मात्र, पीडीपीनेदेखील गूढ मौन पाळले आहे. भाजप शिष्टमंडळाने यासंदर्भात राज्यपाल एन. एन. व्होरा यांची जम्मूत भेट घेतली. मुफ्ती मोहंमद सईद यांच्या निधनानंतर राज्यात ७ दिवसांचा दुखवटा पाळण्यात आला. याचा बुधवारी शेवटचा दिवस होता. गेल्या शुक्रवारपासून राज्याची सूत्रे राज्यपाल राजवटीकडे देण्यात आली होती.

भाजप-पीडीपी युती कायम-
भाजपकडून राज्यपालांनी सरकार स्थापनेविषयी सूचना मागवल्या होत्या, असे भाजप नेते व उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांनी सांगितले. मात्र, यासाठी पीडीपीने पुढाकार घेणे अपेक्षित असल्याचे निर्मल म्हणाले. भाजप-पीडीपी युती राज्यात कायम राहील, अशी हमीदेखील त्यांनी पत्रपरिषदेत दिली. त्यांना वेळ हवा आहे आणि भाजप तो देण्यास तयार आहे. लवकरच सकारात्मक तोडगा निघेल, असा विश्वास सिंह यांनी दर्शवला.

पीडीपीमध्ये अद्याप चर्चा नाही
पार्टीने अद्याप सरकार स्थापनेविषयी कोणतीही आैपचारिक चर्चा केली नसल्याचे पीडीपी नेते नईम अख्तर यांनी सांगितले. अशी चर्चा घडून आल्यानंतरच पार्टी निर्णय घेईल. भाजपशी युती कायम राहील का, या प्रश्नावर प्रतिक्रिया देण्यास अख्तर यांनी नकार दिला. पीडीपीच्या आतील स्रोतांनुसार, पार्टीअंतर्गत आैपचारिक चर्चा झाल्याशिवाय कोणत्याही नेत्याने माध्यमांसमोर बोलू नये, असे आदेश पार्टी प्रमुख महेबुबा मुफ्तींनी दिले आहेत. पीडीपी-भाजप युती कायम राहील का, याविषयी सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे.
बातम्या आणखी आहेत...