आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आघाडी कायम ठेवण्यासाठी पीडीपीच्या अटी-शर्ती, अजेंड्यावरून भाजपसोबत नाराजी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - मुफ्ती मोहंमद सईद यांचे निधन होऊन आठवडा उलटून गेला तरीही जम्मू-काश्मीरमध्ये नवीन सरकार स्थापनेला अपेक्षित गती आलेली दिसत नाही. उलट अगोदर मौन बाळगणाऱ्या पीडीपीने आता अटी-शर्ती लागू केल्या आहेत. आघाडी कायम ठेवायची असल्यास भाजपने गेल्या वर्षीच्या विषयपत्रिकेची ठोस अंमलबजावणी करण्याची ग्वाही द्यावी. त्यानंतरच आघाडी शक्य असल्याचे पीडीपीच्या एका नेत्याने म्हटले आहे.

पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांचे निकटवर्तीय मानले जाणारे नईम अख्तर यांनी भाजपला गुरुवारी कडक संदेश दिला आहे. गेल्या वर्षीच्या अजेंड्याची अंमलबजावणी होणार असेल तरच आघाडी कायम ठेवण्याचा विचार केला जाऊ शकतो, असे अख्तर यांनी म्हटले आहे. दिवंगत मुख्यमंत्री सईद यांचे राज्याच्या विकासाबद्दलचे धोरण काय होते, याची जाणीव जनतेला व्हायला हवी. त्यासाठी हा अजेंडा लागू करण्याची ग्वाही भाजपने दिली पाहिजे. सध्या जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपालांची राजवट आहे. पीडीपीचे प्रमुख तथा मुख्यमंत्री मुफ्ती माेहंमद सईद यांच्या निधनानंतर मेहबुबा मुफ्ती यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यास नकार दिला. त्यामध्ये नेमका विलंब का होत आहे, याबद्दलचे कारण पीडीपीकडून अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. जम्मू -काश्मीरमधील राजकीय अस्थिरतेमुळे भाजपलाही विरोधकांनी लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे; परंतु ही आघाडी कायम ठेवण्यासाठी भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे.

पक्षाची अद्याप बैठकही नाही
प्रसारमाध्यमातून सरकार स्थापनेची उलटसुलट चर्चा होत अाहे; परंतु ५८ वर्षीय मुफ्ती यांनी अद्याप त्यावर पक्षाची बैठक बोलावलेली नाही, असे अख्तर म्हणाले.

त्यांचा स्वत:चा अजेंडा
अख्तर यांच्या वक्तव्यावर भाजपच्या सूत्रांनी म्हटले, ही पीडीपी किंवा मेहबुबा यांची भूमिका नाही. काही लोकांना स्वत:चा अजेंडा चालवायचा असतो. शुक्रवारी यासंदर्भातील बैठक आयोजित करण्यात आली आहे. परंतु अशा सल्ल्यामुळे मेहबुबा यांना त्याचा फटका बसू शकतो, असे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.

चर्चा कशामुळे ?
सईद यांच्या निधनानंतर मेहबुबा यांचे सांत्वन करण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी त्यांना भेटल्या. उभय नेत्यांच्या बैठकीवरून मीडियात पीडीपी-भाजप आघाडीच्या भवितव्यावरून चर्चेला उधाण आले.