आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माई मंगेशकर सभागृहासाठी मराठीजनांचे ७२ लाख, मंगेशकर कुटुंबीयांनी नाकारली मदत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - भारतरत्न व गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या आईच्या नावाने येथे उभारण्यात येत असलेल्या माई मंगेशकर सभागृहावर थकलेले ८५ लाख रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी मराठी बांधवांनी अभूतपूर्व एकजूट दाखवली आहे. देश- विदेशातील मराठी बांधवांनी हे कर्ज फेडण्यासाठी ७२ लाख रुपयांचा निधी जमवला आहे.

सभागृह तयार करण्याच्या मोबदल्यात मंगेशकर कुटुंबीयांनी मराठी समाज संस्थेसोबत सामंजस्य करार केला होता. परंतु आर्थिक मदत न मिळाल्याने सभागृहाचे काम रखडले होते. ते पूर्ण करण्यासाठी संस्थेने ३५ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. ते वेळेत न फेडल्याने ८५ लाखांपर्यंत जाऊन पोहोचले होते. २२ जानेवारी सहकार उपायुक्तांनी पैसे न भरल्याने सभागृह जप्त करून पैसे वसूल करण्याचे आदेश िदले होते. त्याविरोधात मराठी समाज संस्थेने अपील केले होते. मराठी समाजाचे प्रमुख अनिलकुमार घडवईवाले यांनी सांगितले की, उपायुक्तांचा निर्णय आल्यानंतर संस्था पदाधिकाऱ्यांच्या अनेक बैठका झाल्या. मंगेशकर कुटुंबीयांकडेही मदत मागण्यात आली. त्यांना मदतीचा त्यांचा शब्द लक्षात आणून देण्यासाठी पाच हजार पोस्टकार्ड पाठवण्यात आले. पण अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी इंदूर येथे शिकून बाहेर गेलेल्या मराठी बांधवांची मदत घेण्यात आली. संस्थ्येच्या सदस्यांनी आपले नातेवाईक, इंदूर शहरातील कॉलनी, वस्त्यांमध्ये फिरून निधी संकलन केले. सोशल साइट्सवर व्हॉट्सअॅप, फेसबुकवर मोहिम चालवून संस्थेचे बँक खाते क्रमांक, डिमांड ड्राफ्ट, धनादेशांच्या आधारेही निधी संकलन करण्यात आले. या माध्यमातून अवघ्या तीन महिन्यांत कर्ज फेडता येईल इतका निधी जमा झाला आहे.

मराठी बांधवांचा दीड दशकाचा संघर्ष
मंगेशकर कुटुंबीयांना त्यांनी केलेल्या कराराची आठवण करून देण्यासाठी मराठी समाजाचे प्रतिनिधी मंडळ गेल्या १५ वर्षांपासून प्रयत्न करत आहेत. मुंबईला जाऊन त्यांनी हृदयनाथ मंगेशकर यांचीही भेट घेतली. परंतु मदत नाही मिळाली. काही िदवसांपूर्वी हृदयनाथ मंगेशकर सानंद येथे कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी प्रतिनिधी मंडळाच्या सदस्यांशी ते मदतीबाबत काहीच बोलले नाहीत.

संस्थाच सभागृह चालवणार
घडवईवाले यांनी यांनी सांगितले की, संस्था कुठल्याही परिस्थितीत सभागृह कर्जमुक्त करणार आहे. त्यानंतर त्याचे संचलनही करणार आहे. शाळा, महाविद्यालये, खासगी सामाजिक संस्थांना हे सभागृह कार्यक्रमांसाठी उपलब्ध करून देण्यात येईल. त्यातून मिळणाऱ्या पैशातून सभागृहाची देखभाल करण्यात येईल. तसेच तेथे सुविधाही उपलब्ध करून दिल्या जातील.
बातम्या आणखी आहेत...