आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेने हादरलेला अरुंद पूल पडत असल्याच्या अफवेने वाराणसीत चेंगराचेंगरी; 25 जणांचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाराणसी - अाध्यात्मिक गुरू जय गुरुदेव यांच्या सत्संगासाठी निघालेल्या गुरू जय गुरुदेव यांच्या २५ भक्तांचा वाराणसीजवळ चेंगराचेंगरीत मृत्यू झाला. वाराणसी व चंदोलीस जोडणाऱ्या दीड किमी लांबीच्या अरुंद अशा राजघाट पुलावर ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये २० महिला आहेत. १७ जणांची ओळख पटली असून ६० हून अधिक जखमी आहेत.
चंदोलीच्या डोमरीमध्ये रविवारपासून जय गुरुदेव यांचा सत्संग आहे. शनिवारी ३ लाखांहून अधिक भक्त यासाठी आले आहेत. विशेष म्हणजे प्रशासनाकडे यासाठी तीन हजार लोकांचीच परवानगी घेण्यात आली होती. जय गुरुदेव यांचे प्रवक्ते राजबहादूर म्हणाले, हा पूल लोकांनी गच्च भरलेला होता. पोलिसांनी त्यांना पुढे जाऊ दिले नाही. लाठीमार करून लोकांना परत पाठवू लागले. मग पुलावर दोन्ही बाजूंनी लोक आत घुसू लागले. यादरम्यान पूल पडल्याची अफवा पसरली आिण चेंगराचेंगरी झाली. प्रशासनही लाचार होते. कारण शहरात कोंडी झाली होती. बचाव पथके किंवा रुग्णवाहिका दुर्घटनास्थळी पोहोचू शकल्या नाहीत. वाराणसीत २० वर्षांनंतर या मोठ्या सत्संगाचे आयोजन केले होते. तेव्हा १० लाख लोक आले होते.
काही तासांत जमले ५ लाख लोक, आजचा सत्संग रद्द, गर्दी कमी करण्याचा प्रयत्न
बाबा जय गुरुदेव यांच्या जयंतीनिमित्त २० वर्षांनंतर वाराणसीत मोठा सत्संग होत आहे. यात शनिवारी मांसभक्षण व दारूविरोधी शाेभायात्रा काढण्यात आली. आयोजकांनी या सत्संगासाठी ३ हजार लोक येतील, असे सांगून परवानगी घेतली होती. मात्र, आले ३ लाखांहून अधिक लोक. शाेभायात्रा सकाळी ९ वाजता निघाली. डोमरीहून जथ्थे निघाले. राजघाट पुलावरून हे जथ्थे शहरात आले. यात कार, जीप, दुचाकीही होत्या. मात्र, बहुतांश लोक पायीच होते. एकीकडून गाड्या जात होत्या आणि दुसऱ्या बाजूने लोक पुलावरून निघाले होते. पाऊण वाजता सुमारे १५ हजार लोक या पुलावर होते. लोकांना उष्मा आणि तहानेमुळे चक्कर येऊ लागली. याच वेळी या डबल डेकर पुलावरून रेल्वे गेली. पूल नेहमीसारखा हादरला. तेवढ्यात एक महिला ओरडली... पूल हलतोय, पडेल... हे ऐकताच पळापळ सुरू झाली. अनेक लोक चेंगरले गेले. आश्चर्य म्हणजे या दुर्घटनेनंतरही शोभायात्रा सुरूच होती. एका मुलीस विचारले तेव्हा ती म्हणाली, ‘गुरुदेव सांगत, जो जन्मतो त्याला मरण आहेच.’ दरम्यान रात्री हा सत्संग रद्द करण्यात आला.
गर्दीमुळे दुर्घटनेनंतर ३ तास अधिकारी चार किमीवर अडकले
दुर्घटनेनंतर तीन तास उलटले तरी एसपी, जिल्हाधिकारी, आयुक्त घटनास्थळापासून चार किमी अंतरावर उभे होते. गर्दीमुळे मदत पथकेही पोहोचू शकत नव्हती. वाराणसी-मुगलसरायला जोडणारा हा एकमेव पूल. त्यामुळे यावरून होणारी वाहतूक कोणत्याही परिस्थितीत थांबवता येत नाही.
बातम्या आणखी आहेत...