आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Phailin Disaster : 2.5 Lack People Stranded In Flood

फायलिनचे तांडव: ओडिशामध्ये 2.5 लाख लोक महापुरात अडकले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुवनेश्वर/ विशाखापट्टणम - भयावह फायलिन वादळाच्या तांडवानंतर ओडिशामध्ये महापुराचे महासंकट आले असून अनेक नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. महापुराचा सर्वाधिक तडाखा मयूरबानी आणि बालासोर जिल्ह्याला बसला आहे. बालासोरमध्ये अडीच लाख लोक महापुरात अडकून पडले आहेत. फायलिन वादळ झारखंडच्या दिशेने आगेकूच करत असून झारखंडसह ओडिशा, पश्चिम बंगाल, बिहार, सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस सुुरू आहे. येत्या 48 तासांत या राज्यांत महाअतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.


फायलिन चक्रीवादळ शनिवारी रात्री आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किना-यावर धडकल्यानंतर देशातील आजपर्यंतचे सर्वात मोठे मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर हाती घेण्यात आले होते. या चक्रीवादळाने विनाशाचे तांडव सुरू केले असून मुसळधार पावसामुळे पूर्वेकडील राज्यातील स्थिती गंभीर बनली आहे. ओडिशामधील सुवर्णरेखा सारख्या प्रमुख नद्यांना मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये मदत व बचाव कार्यासाठी लष्कर, नौदल, हवाई दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) तुकड्यांसह त्या त्या राज्यातील आपत्कलीन प्रतिसाद दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. ओडिशामध्ये मयूरबानी आणि भद्रक जिल्ह्यात पुरामुळे 4 लोकांचा मृत्यू झाल्याने फायलिनमुळे बळी पडलेल्यांची संख्या 27 वर गेली आहे. आंध्र प्रदेशातही मदत कार्य युद्धपातळीवर सुरू असून श्रीकाकुलम जिल्ह्यातील जनजीवन दोन दिवसांत पूर्वपदावर येईल, असे अधिका-यांनी सांगितले. झारखंडमध्ये मुसळधार पावसामुळे घरांची प्रचंड पडझड झाली असून गिरिडीह जिल्ह्यात नदीवरील पूल कोसळला.


रेल्वे सेवा पूर्ववत
चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेले लोहमार्ग नीट केल्यानंतर पूर्व किनारी रेल्वेने रेल्वेसेवा पूर्ववत सुरू केली आहे.


पारादीप बंदर अंशत: सुरू
वादळामुळे मोठे नुकसान झालेल्या पारादीप बंदरावरील कामकाज अंशत: सुरू करण्यात आले आहे. हे बंदर पूर्ण क्षमतेने कार्यरत होण्यास आणखी काही दिवस लागतील असे पोर्ट ट्रस्टने म्हटले आहे. सोमवारी या बंदरावर 26650 मेट्रिक टन इंधन घेऊन आलेले एमव्ही युनायटेड या जहाजाने नांगर टाकला.


चोहीकडे विध्वंसच विध्वंस : 14 वर्षांतील सर्वात भंयकर चक्रीवादळ ओसरल्यानंतर मदत छावण्यात हालवण्यात आलेले हजारो लोक घरी परतले तेव्हा त्यांना जिकडे तिकडे विध्वंसच पाहावा लागला. पडझड झालेली घरे आणि नेस्तनाबूत झालेली शेतातील पिके यामुळे हजारो कुटुंबे हताश झाली आहेत. त्यांना आता भविष्याची चिंता सतावू लागली आहे.


48 तासांत महाअतिवृष्टीचा इशारा
हवामान खात्याने येत्या 48 तासांत बिहार, सिक्कीम, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये महाअतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे अनेक नद्यांना महापूर येण्याची शक्यता आहे. फायलिनचा प्रभाव ओसरला असला तरी ते उप- हिमालयीन प्रदेशात पोहोचताच कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन ढगांची गर्दी होईल व महाअतिवृष्टी होईल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.


‘ग्लोबल वॉर्मिंग’चा फटका
फायलिन चक्रीवादळासाठी ग्लोबल वॉर्मिंग जबाबदार असल्याचे ग्रीन पीसने म्हटले आहे. जलवायुमान बदलाचे आक्राळविक्राळ स्वरूप आता समोर येऊ लागले आहे. त्यामुळे लोकांना प्रचंड नुकसान सोसावे लागत आहे, असे संस्थेचे सदस्य डॉ. विश्वजित मोहंती यांनी म्हटले आहे.


8000 टन लोखंडासह जहाज बुडाले
फायलिन चक्रीवादळामुळे चीनकडे 8000 टन लोखंड घेऊन निघालेले पनामा हे मालवाहू जहाज सागर बेटापासून 24 नॉटीकल मैलावर बुडाले. मात्र, जहाजावरील चालक दलाच्या 28 सदस्यांना तटरक्षक दलाच्या जवानांनी वाचवले. बुडालेल्या जहाजाचा अद्याप पत्ता लागलेला नाही.


आता झारखंडवर संकट
फायलिन चक्रीवादळाने झारखंडच्या दिशेने आगेकूच केली असून तेथे सोसाट्याच्या वा-यासह मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. खबरदारीचे उपाय म्हणून 10,000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.


विमानातून अन्नाची पाकिटे
बालासोर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी विमानातून अन्नाची पाकिटे टाकण्यात येत आहेत. या जिल्ह्यातील पूरस्थिती हा गंभीर चिंतेचा विषय बनला आहे, असे ओडिशाचे महसूल व आपत्कालीन व्यवस्थापन मंत्री एस. एन. मोहपात्रा यांनी म्हटले आहे.


काँग्रेसने आपत्ती व्यवस्थापनाचे घेतले श्रेय
नवी दिल्ली। फायलिन चक्रीवादळामुळे निर्माण झालेली स्थिती यशस्वीपणे हाताळल्याचे श्रेय काँग्रेसने घेतले आहे. आमच्या राजवटीतच देशाला आपत्ती संवेदनशील बनवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात आली आहेत. त्यामुळे हवामान खात्याने अचूक अंदाज व्यक्त केला आणि ओडिशा व आंध्र प्रदेशात दहा लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हालवण्यात आले, असा दावा काँग्रेसने केला आहे. विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री जयपाल रेड्डी आणि गृह राज्यमंत्री मुल्लापल्ली रामचंद्रन यांनी सोमवारी काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली आणि श्रेय काँग्रेससह यूपीएला दिले.


नुकसानीचे तांडव
35000 गावे आंध्र व ओडिशातील कचाट्यात
3755000 घरांची पडझड
आंध्र प्रदेश 30,000 एकरातील पिके उद्ध्वस्त
3000 घरे जमीनदोस्त
400 किलोमीटर लांबीच्या विद्युत तारा तुटल्या.
ओडिशा 10,000 घरांची पडझड
5,000 चौरस किलोमीटर शेतीतील भातपीक नष्ट
झारखंड 400 घरे उद्ध्वस्त


बळींची संख्या
ओडिशा 27 बळी
बिहार 2
पश्चिम बंगाल 2
बिहार 4


आयएनएस चिलिकाचे डायव्हर्स मदतीला
बालासोर जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नौदलाच्या आयएनएस चिलिकाच्या डायव्हर्सची तीन पथके कामाला लावण्यात आली आहेत.