आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बाेलणार नाही काम करून दाखवणार’; जाणून घ्या, पंतप्रधान मोदींनी का केली जयापूरची निवड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाराणसी - पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी पहिल्यांदाच आपला मतदारसंघ वाराणसीमध्ये दाखल झाले. विणकरांसाठी व्यापारी केंद्राच्या इमारतीचा कोनशिला समारंभ त्यांच्या हस्ते पार पडला. खासदार आदर्श गाव योजनेअंतर्गत जयापूर गाव त्यांनी दत्तक घेतल्याचे जाहीर केले. कार्यकर्ते आणि गावक-यांशी संवाद साधला. त्यांच्या अडीअडचणी ऐकून घेतल्या. मी खूप घोषणा करेल, असे बोलले जात आहे; परंतु मी बोलण्यापेक्षा जास्तीत जास्त काम करून दाखवेन, अशी ग्वाही मोदींनी दिली.

लालपूरमध्ये विणकरांसाठी व्यापारी सुविधा केंद्र, संग्रहालयाच्या इमारतीचा कोनशिला समारंभ शुक्रवारी पंतप्रधानांच्या हस्ते पार पडला. तेथील आपल्या ३० मिनिटांच्या भाषणात ते म्हणाले, ई-व्यापार झपाट्याने वाढू लागला आहे. जागतिक बाजारात संधी वाढल्या आहेत. विणकरांनी आधुनिकता स्वीकारून प्रगती साधली पाहिजे. बनारसी साडी ठाऊक नसलेली महिला देशात सापडणार नाही.

जयापूरच का?
वाराणसीचा उमेदवार म्हणून निवड झाल्यानंतर मी सर्वात अगोदर जयापूरचे नाव ऐकले होते. तेही संकटाच्या काळात. त्या वेळी जयापूरमध्ये आगीच्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून जयापूर माझ्या मनात होते. ज्या नात्याची सुरुवात संकटाने होते, ते आजीवन टिकणारे असते. या खासदार आदर्श ग्राम योजनेत खासदार गावाला नव्हे, तर गावच खासदाराला दत्तक घेत आहे.

पैसा मिळणार नाही
आदर्श ग्राम योजनेसंबंधी नेहमीच स्पर्धा पाहायला मिळते. यातून प्रतिस्पर्धीपणाची भावना निर्माण होते, हे योग्य नाही. म्हणूनच खासदार आदर्श ग्राम योजनेत सरकार एका पैशाचीदेखील मदत करणार नाही. कारण ज्या योजनेत सरकारी पैसा येतो, तेथे लूट होते. मला येथे लोकसहभागातून गावाचा विकास करायचा आहे, असे मोदींनी आपल्या भाषणात सांगितले. कन्या भ्रूणहत्या रोखल्या पाहिजेत. मुलगी जन्माला आल्यानंतर उत्सव साजरा करावा.