आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकास जादूटोण्याने नव्हे बदलातून होणार, मोदींनी चढवला हल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मधुबनी / मधेपुरा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी बिहारच्या मधुबनी आणि मधेपुरामध्ये नितीश सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, ज्यांच्याकडे बहुमत नाही ते जादूटोण्याकडेच जातील. एखाद्या कुटुंबातील व्यक्ती आजारी पडला तर दिल्ली-मुंबईच्या रुग्णालयात नेले जाते. तिथे इलाज झाला नाही तरच जादूटोण्याकडे जातात. नितीशजी, जादूटोण्याने देश चालणार नाही आणि विकासही होणार नाही. जादूने दिवा लागत नाही, शिक्षण येत नाही, ना अभ्यास होतो ना विकास होतो.

मोदी म्हणाले, बिहारमध्ये ३० ते ३५ वर्षांच्या महिला अर्जावर स्वाक्षरीऐवजी अंगठ्याचा ठसा लावतात. ही लालूजींच्या कुसंस्कृतीची निशाणी आहे. मधेपुरामध्ये कोसीच्या वाईट अवस्थेसाठी नितीश सरकारला जबाबदार धरत मोदी म्हणाले, सरकारच्या अपयशामुळेच बिहारचे पाणी आणि तरुणांचे मनुष्यबळ नष्ट होत आहे. दोघेच येथील भविष्य बदलू शकतात. इथे पाणी आहे, मात्र बिहार ४०० कोटी रुपयांचा मास दरवर्षी खरेदी करत आहे. येथील तरुण परराज्यात स्थलांतर करत आहेत आणि पाणी समुद्राला जाऊन मिळत आहे. त्याचा उपयोग होत नाही. बिहारच्या हृदयात प्रेम आणि काम करण्याची इच्छाशक्ती असेल तर हे काम कठीण नाही.

मोदी सर्वात "घटिया' पंतप्रधान : लालू
किशनगंज । राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी पंतप्रधान मोदी, भाजपध्यक्ष अमित शहा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि ओवेसी बंधूंवर प्रखर टीका केली. त्यांनी मोदींना आतापर्यंतचे सर्वांत "घटिया' पंतप्रधान ठरवले. ते म्हणाले, भाजपला केवळ तोडणे माहीत आहे, जोडणे नाही. भाजपने दसरा-मोहरममध्ये दंगली घडवण्याचा प्रयत्न केला आणि वर हे जंगलराज दोन असल्याचे म्हणत आहे. हे जंगलराज नव्हे मंडलराज टू आहे. बिहारला जंगल म्हणत असाल तर इथे फिरायला का येता.

चौथ्या टप्प्यात ५५ टक्के मतदान
बिहार विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात रविवारी ५५ टक्के मतदान झाले. हा टप्पा राजद-काँग्रेस महाआघाडीसाठी महत्त्वपूर्ण मानला जातो. लाेकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत भाजपने येथून सातपैकी सहा जागा जिंकल्या होत्या. २०१० च्या विधानसभेवेळी भाजप, जदयू आणि राजद वगळता अन्य काेणत्याही पक्षाने खातेही उघडले नव्हते. त्यामुळे या टप्प्यात भाजपवर सर्वाधिक दबाव होता. चौथ्या टप्प्यात पश्चिम चंपारण्य, पूर्व पंचारण्य, शिवहरी, मुजफ्फरपूर, गाेपालगंज आणि सीवान जिल्ह्याचा समावेश आहे. २०१० च्या निवडणुकीत या टप्प्यातील ५५ जागांपैकी भाजपच्या पारड्यात २६, जदयू २४ आणि राजदला २ जागा मिळाल्या होत्या. तीन अपक्ष उमेदवार जिंकले होते.