आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसाम विकासात मागे का? 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या काँग्रेसवर मोदींची टीका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोक्राझार (आसाम) - आसाममध्ये पंधरा वर्षांपासून सत्तेत असलेल्या काँग्रेस सरकारवर प्रचंड टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी या सभेच्या निमित्ताने आगामी विधानासभा निवडणुकीचा बिगुल दिला. या राज्याने दहा वर्षे देशाला पंतप्रधान निवडून दिला तरी विकासात हे राज्य मागासलेले का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
याच राज्यातून निवडून जाणारी व्यक्ती देशाच्या पंतप्रधानपदी दहा वर्षे राहिली. तेव्हा विकासाबद्दल कोणी शब्दही काढला नाही. मात्र, माझ्या पंधरा महिन्यांच्या कारकीर्दीतच या राज्याच्या सर्व समस्या दूर व्हाव्यात, अशी अपेक्षा हे लोक करत आहेत, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. हा एकप्रकारे माझ्यावर अन्याय आहे, असे वाटत नाही का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित लोकांना केला. आसामसह ५ राज्यांमध्ये येत्या एप्रिल-मे महिन्यात विधानसभा निवडणूक अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी कोक्राझारमध्ये जाहीर सभा घेतली. भाजप व स्थानिक बोडोलँड पीपल्स फ्रंटच्या (बीपीएफ) वतीने ही सभा आयोजित करण्यात आली. मोदी म्हणाले, बोडोलँड टेरिटोरियल कौन्सिलच्या प्रदेशात काँग्रेसने लोकांचा विश्वासघात केला आहे. मात्र, भाजप या भागात विकासासाठी कटिबद्ध आहे.
काँग्रेस दिशाभूल करत असल्याचा आरोप करून पंतप्रधान म्हणाले, या मंडळींनी माझी तुलना राज्यात पंधरा वर्षांपासून सत्तेत असलेल्या गोगोई सरकारशी करावी. १५ वर्षांपासून काँग्रेस येथे सत्तेत आहे. मला तर सत्तेत येऊन केवळ पंधरा महिनेच झाले आहेत.

अनुसूचित जमातीचा दर्जा : आसामच्या पठारी भागांत वास्तव्य करून असलेल्या कार्बी तसेच डोंगराळ भागात राहणाऱ्या बोडो जमातीच्या लोकांना अनुसूचित जमातीचा
दर्जा दिला जाईल, अशी घोषणा मोदींनी या वेळी केली.
बीपीएफचा प्रभाव
बोडोलँड पीपल्स फंट (बीपीएफ) या संघटनेचा कोक्राझार व परिसरात प्रभाव आहे. २००३ मध्ये बोडोलँड प्रादेशिक परिषदेची स्थापना झाल्यापासून बीपीएफची या परिषदेवर सत्ता आहे. २००६ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बीपीएफने ११ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसशी युती करून तरुण गोगोई सरकारमध्ये हा पक्ष सहभागी होता. २०१४ मध्ये मात्र या पक्षाने काँग्रेसशी असलेली युती तोडली आहे.
विकास हेच उत्तर
या भागातील समस्यांचे विकास हेच एकमेव उत्तर असल्याचे मोदी म्हणाले. लोकांचे स्वप्न आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी दोन्ही हातांनी मदत करण्यास तयार आहे. राज्य सरकार गेल्या काही वर्षांत जे करू शकले नाही ते आपण करून दाखवू, अशी हमी त्यांनी जनतेला दिली. दिल्ली पोलिसांत उत्तर-पूर्व राज्यांतील युवकांची प्राधान्यक्रमाने भरती करण्याचे निर्देश आपण दिले असल्याचेही मोदींनी सांगितले.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, संबंधित फोटो....