फोटो - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जॉन केरी यांच्या भेटीदरम्यानचे छायाचित्र
नवी दिल्ली - जागतिक व्यापार करारावर सह्या करण्यास नकार देण्याच्या भारताच्या निर्णयाने चुकीचा संदेश जात असल्याचे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुक्रवारी सांगितले. त्यामुळे लवकरात लवकर यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करावा, अशी विनंती त्यांनी मोदींना केली.
कृषीमालाच्या साठ्यासंदर्भात सूट मिळण्याच्या भारताच्या मागणीमुळे व्यापार सुलभीकरणासाठी जागतिक व्यापार संघटनेचा करार गुरुवारी होऊ शकला नव्हता. या करारावर सही करण्यास नकार दिल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींची चुकीची प्रतिमा निर्माण होत असल्याचेही केरी म्हणाले. मोदी आणि केरी यांच्या भेटीनंतर अमेरिकेच्या अधिका-यांनी पत्रकारांना याबाबत माहिती दिली.
या आठवड्यात या करारावर सह्या होतील अशी अपेक्षा सगळ्या अधिका-यांना होती पण तसे झाले नाही. या करारामुळे जगभरात मोठ्या प्रमाणावर (सुमारे दोन कोटीपेक्षा अधिक) नोक-यांची संधी निर्माण होणार आहे. पण जेव्हा भारताने या काराराच्या मोबदल्यात आपल्याला महत्त्वाच्या ठरावीक कृषी उत्पादनाच्या साठ्याची आणि त्याबाबतच्या इतर निर्णयांची परवानगी मिळावी अशी मागणी केली, त्यामुळे हा करार होऊ शकला नाही. यासंदर्भात योग्य तोडगा निघू शकला नसल्याचे जागतिक व्यापार संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, काही देशांनी या स्थितीत भारत तयार नसल्यास भारताला सोडून करार करण्याचा निर्णय घेण्याबाबातही चर्चा केली आहे.