आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरपंचांच्या भाषणावेळी पंतप्रधान मोदींनी अॅडजस्ट केला माईक, विकासासाठी दत्तक घेतले जयापूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : माईक अॅडजस्ट करताना नरेंद्र मोदी

वाराणसी - सांसद आदर्श गाव योजनेंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमधील जयापूर या गावाची निवड केली आहे. या कार्यक्रमासाठी जेव्हा नरेंद्र मोदी जयापूर येथे पोहोचले त्यावेळी त्यांचे गावक-यांनी ओवाळून स्वागत केले. या योजनेत खासदार गाव दत्तक घेणार नसून गावाने त्यांना दत्तक घ्यावे अशा शब्दांत मोदींनी यावेळी आपली भूमिका मांडली.
सरपंचांसाठी माईक अॅडजस्ट केला
जयापूर येथे आल्यानंतर मोदींचे गावक-यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर व्यासपीठावर जेव्हा गावाच्या महिला सरपंच दुर्गादेवी मोदींच्या स्वागताचे भाषण करण्यासाठी उभ्या राहिल्या त्यावेळी माईकची उंची त्यांच्यापेक्षा जास्त होती. त्यामुळे त्यांचा आवाज येत नव्हता. ते पाहून पंतप्रधानांनी स्वतः उठून त्यांच्यासाठी माईक अॅडजस्ट केला. त्यानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला.
(व्हिडीओ पाहा चौथ्या स्लाईडवर)
खासदाराने स्वतः त्याच्या क्षेत्रातील गावांचा विकास अनुभवावा आणि त्या माध्यमातून देशाचा विकास व्हावा हा या योजनेचा उद्देश असल्याचे मोदी म्हणाले. या योजनेमध्ये पैशाचा समावेश करण्यात आलेला नाही. कारण पैसा आला तर खाणारे जमा होतील, आणि योजनेचा बट्ट्याबोळ होईल. त्यामुळे यात पैसा नसल्याचे मोदींनी सांगितले.
विणकरांसाठीच्या ट्रेड फॅसिलिटी सेंटरचे उद्घाटन
त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीच्या लालपूर येथे आयोजित कार्यक्रमात विणकरांसाठी ट्रेड फॅसिलिटी सेंटरची पायाभरणी केली. जगाशी स्पर्धा करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे गरजेचे आहे. त्यासाठी या सेंटरचे मोठे योगदान असेल असे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कार्यक्रमात बोलताना सांगितले. सत्तास्थापनेनंतर मोदी प्रथमच वाराणसी दौ-यावर आले आहेत. त्यामुळे पंतप्रधानांच्या या दौ-यासाठी कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे.
काय म्हणाले मोदी...
हैदराबादमध्ये आलेल्या वादळामुळे त्याठिकाणी जाणे गरजेचे होते. त्यामुळे मला वाराणसीचा दौरा पुढे ढकलावा लागला. पण आज मी आपला सेवक म्हणून याठिकाणी उपस्थित आहे. देशात कृषी क्षेत्रानंतर सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र म्हणजे कापड उद्योग हे आहे. कामगार आणि मालकामध्ये दरी या क्षेत्रात असणे शक्यच नाही. या क्षेत्रात रोज नवे बदल होत आहेत. त्यामुळे त्यानुसार आपल्यालाही बदल करणे गरजेचे आहे. ग्राहकालाही हेच बदल अपेक्षित असतात. ज्याला हा बदल हेरता येत नाही, त्याच्या व्यवसायामध्ये वाढ होण्याची शक्यता अत्यंत कमी असते.

समाजातील सर्व वर्गातील लोक या व्यवसायाशी निगडीत आहेत. आधुनिकीकरणात टिकाव लागावा म्हणून नवीन व्यवस्था तयार करणे गरजेचे आहे. त्यासाठी केवळ आर्थिक निधी देऊन भागत नाही. एक दृष्टीकोन ठेवून त्यात बदल करावे लागतात. त्याची सुरुवात आज वाराणसीच्या धर्तीवर होत आहे. केवळ बँकांकडून कर्ज काढून सर्वकाही होत नाही. तर त्याच्या बारीक सारीक बाबींवर त्यासाठी लक्ष देणे गरजेचे आहे.
आज कॉम्प्युटरच्या माध्यमातून नुकसान कमीत-कमी करणे शक्य झाले आहे. येथे काम करणा-या विणकरांनी त्यासाठी आयआयटीमध्ये जाऊन शिक्षण घेणेच गरजेचे नाही. तर त्यांना याठिकाणीही याचे प्रशिक्षण दिले जाऊ शकते. त्यामुळे जर येथील लोकांना डिझाईन, स्पीड यासंदर्भात प्रशिक्षण दिले तर उत्पादनात मोठी वाढ होईल. या माध्यमातून त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यात काळानुसार तंत्रज्ञान बदलण्याचा महत्तावाच मुद्दा असेल. जगाशी स्पर्धा करण्याच्या दृष्टीने तंत्रज्ञानात बदल करणे गरजेचे आहे. त्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
नवी पिढी या क्षेत्रात बळजबरीने आणता कामा नये त्यांनी अभिमानाने या क्षेत्रात उतरणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांना उत्पन्नाची हमी हवी. आज बनारसी साडी माहिती नसेल अशी महिलाच देशात नाही. पण यात आपले योगदान नाही. आपल्या पूर्वजांनी एवढ्या श्रद्धेने काम केले आहे, ते आपोआप लोकांपर्यंत पोहोचले. आगामी काळात आपल्याच देशांत सुमारे वीस कोटी कन्यांचे विवाह होणार आहेत. म्हणजे प्रत्येकी एक साडीचा विचार केला तरी वीस कोटी साड्यांच्या व्यवसायाची संधी आपल्यासमोर आहे.
कडेकोट सुरक्षा...
सहा हजार पोलिस कर्मचा-यांचे 10 पातळ्यांवरील सुरक्षा कडे तयार करण्यात आले आहे. मोदींचा हा दौरा 24 तासांपेक्षा थोडा मोठा असण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत विजयानंतर मोदींनी वारणसीत काशी विश्वनाथ मंदिरात पुजा केली होती. तसेच गंगा आरतीमध्येही सहभागी झाले होते.
CM अखिलेश यांनी केले स्वागत
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. केंद्रीय वस्त्र मंत्री संतोष गंगवारही यावेळी उपस्थित होते. केंद्रात भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर भाजप आणि सपामध्ये अनेक आरोप प्रत्यारोपाच्या फैरी उडाल्या. पण पंतप्रधानांच्या दौ-याच्या पार्श्वभूमीवर अखिलेश सर्व काही मागे सोडून त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. यावेळी राज्यपाल राम नाईक हेही याठिकाणी उपस्थित असतील.
पुढील स्लाइड्सवर पाहा, मोदींच्या कार्यक्रमाचे आणि दौ-याच्या तयारीचे PHOTO