आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

झारखंडमध्ये पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत मुख्यमंत्री सोरेन यांच्याविरोधात घोषणाबाजी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची - झारखंडमध्ये जोरदार पावसातच पंतप्रधान मोदींनी सहा योजनांचे भूमीपूजन आणि उदघाटन केले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन देखील उपस्थित होते. सोरेन यांच्या भाषणादरम्यान, लोकांनी गोंधळ सुरु केला. मुख्यमंत्री विरोधी आणि मोदी-मोदी घोषणांनी लोकांनी सोरेन यांच्या भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस नेत्या अंबिका सोनी यांनी हे मुख्यमंत्री सोरेन यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे षडयंत्र असल्याचे म्हटले. तर, भाजपने काँग्रेसच्या आरोपावर मोदींची देशात लोकप्रियता वाढत असेल तर चांगलेच असल्याचे म्हटले आहे.
काय झाले मंचावर
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन भाषणासाठी उभे राहिले असताना, उपस्थित जनसमुदायामधून 'मोदी-मोदी' अशा घोषणा दिल्या जाऊ लागल्या. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बसल्या जागेवरुन हातांनी इशारा करुन लोकांना शांत राहाण्याचे आवाहन केले. त्यानंतर लोक शांत झाले. मुख्यमंत्री सोरेन म्हणाले, 'या मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचा मान राखला जाईल असे वागले पाहिजे. आपल्या सोबत येथे पंतप्रधान आहेत, याचे भान राखले पाहिजे.'
हरियाणामध्येही मोदींच्या उपस्थितीतील कार्यक्रमात तेथील मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा यांच्या विरोधात घोषणाबाजी झाली होती. त्यानंतर हुड्डा यांनी यापुढे पंतप्रधानांच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे म्हटले होते.
काय म्हणाले मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडच्या स्थानिक भाषेत भाषणाला सुरवात केली. त्यांनी झारखंडच्या नैसर्गीक सौंदर्याची स्तूती केली. झारखंडच्या लोकांनी लोकसभा निवडणुकीत भाजपवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले. या विश्वासाची परतफेड राज्याच्या विकासाच्या माध्यमातून करणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले.
मोदी म्हणाले, 'झारखंडमध्ये गुजरातपेक्षा कित्येक पटीने साधनसंपत्ती उपलब्ध आहे. त्यामुळे या राज्याचा विकास हा अधिक वेगाने होऊ शकतो. झारखंड राज्याची निर्मीती माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी केली आहे, मात्र राज्याच्या सध्याच्या परिस्थितीवर ते खूश नाहीत. ही परिस्थिती बदलली पाहिजे. वाजपेयींच्या काळात या राज्याचा जेवढा विकास झाला, आणि तो तिथेच थांबला. तो पुढे नेण्याचे भाग्य कदाचित मला लाभणार आहे.'
भारताला महान आणि विकासाच्या शिखरावर न्यायचे असेल तर देशाचा कोणताही भाग दुबळा राहिला नाही पाहिजे, असे मोदी म्हणाले.
मोदी म्हणाले, 'जवळपास 15 हजार कोटींची गुंतवणूक असणारी ही योजना केवळ झारखंडमेध्येच प्रकाश निर्माण करणार नाही, तर संपूर्ण देशातील अंधकार दूर करेल.'
मुख्यमंत्री म्हणाले, पंतप्रधानांनी चहा विकली, तर माझ्या आईनेही लोकांची भांडी घासून मला या पदापर्यंत पोहोचवले

मुख्यमंत्री हेमंत सोरेन म्हणाले, 'पंतप्रधान मोदी आणि माझ्यामध्ये एक समानता आहे. पंतप्रधानांनी एकेकाळी चहा विकून आयुष्याची सुरवात केली होती. त्याच प्रमाणे माझ्या आईने लोकांच्या घरी भांडी घासून माझे शिक्षण पूर्ण केले आणि मला मुख्यमंत्री पदाच्या लायक बनविले.' सोरेन यांनी केंद्र सरकारकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. ते म्हणाले, 'केंद्र सरकारचे सहकार्य राहिले तर, एक गोळीही न चालवता नक्षलवाद संपूष्टात आणता येईल. त्यानंतर येथील नैसर्गिक सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची रिघ लागेल.' यावेळी मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारने कोळशावर अधिक रॉयल्टी द्यावी अशी मागणी केली.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, मोदींनी कोणत्या योजनांचे उदघाटन आणि भूमीपूजन केले... पंतप्रधानांच्या भाषणाचा व्हिडिओ