आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक विधेयकांना गती देण्यासाठी अम्मांना साकडे, पंतप्रधानांची जयललिता यांच्याशी चर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दौऱ्यात जयललिता यांच्याशी भूसंपादनाच्या विधेयकावर समर्थन मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. - Divya Marathi
दौऱ्यात जयललिता यांच्याशी भूसंपादनाच्या विधेयकावर समर्थन मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.
चेन्नई- काँग्रेसने ‘संसद ते सडक’ असे घेरल्यामुळे संसदेत आर्थिक सुधारणाविषयक विधेयके विशेषत: भूसंपादन विधेयकावरून कोंडी निर्माण झाली आहे. ही कोंडी फोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांची भेट घेतली. पोज गार्डन येथील अम्मांच्या निवासस्थानी मोदींनी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येते.
रालोआच्या वादग्रस्त भूसंपादन विधेयकाला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदी-जयललिता यांच्या भेटीला महत्त्व आले आहे. भूसंपादनाला अण्णा द्रमुक पक्षाने आपला पूर्ण पाठिंबा द्यावा, अशी भूमिका मोदी यांनी मांडली. त्यावर जयललिता यांच्याकडून सहमतीचे संकेत देण्यात आले असले तरी शेतकऱ्यांना वाटणाऱ्या काही शंकांचे निरसन करण्याविषयी त्यांनी पंतप्रधानांकडे आग्रह धरला. मद्रास विद्यापीठाच्या वतीने राष्ट्रीय हँडलूम दिनाच्या निमित्ताने आयोजित समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली होती; परंतु त्या समारंभात जयललिता यांची उपस्थिती नव्हती. परंतु समारंभात जयललिता यांचे स्वागतपर भाषण वाचून दाखवण्यात आले होते. त्या अगोदर जयललिता यांनी मोदींचे विमानतळावर स्वागत केले.

‘वणकम..मागुची’ प्रेक्षकांशी संवाद
हँडलूम दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य लोकांशी तामीळ भाषेतून संवाद साधण्याचा प्रयत्न केला. भाषणाची सुरुवात त्यांनी अस्सल तामिळीतून केली. ‘वणकम. तामिलनाडू वंगादुकू मिघाझा मागुची. मक्काला कानार्धुकू मिघाझा मागुची’(तामिळनाडूत आल्यानंतर लोकांच्या भेटीने आनंद वाटला.) अशी सुरुवात करून हँडलूम उत्पादनांचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.

विधेयक मंजुरीसाठी संख्याबळ गरजेचे
वादग्रस्त भूसंपादन विधेयकावर मोदी सरकारची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. एक इंचभर जमीनही घेऊ देणार नाही, असा पवित्रा काँग्रेसने घेतला आहे. त्यामुळे केंद्र सरकारला आपल्या प्रस्तावाच्या बाजूने समर्थन करण्यासाठी लोकसभेबरोबरच राज्यसभेतही सदस्यांची गरज भासणार आहे. अण्णा द्रमुक पक्षाचे लोकसभेत ३७, तर राज्यसभेत ११ खासदार आहेत. त्यामुळे ही भेट महत्त्वाची होती.

आंतरराज्य नदी तंट्यावर निवेदन
भेटीदरम्यान जयललिता यांनी पंतप्रधानांसमोर कर्नाटक, केरळसोबत नदीच्या पाणी वाटपासंबंधीचा मुद्दा उपस्थित केला. तसे निवेदनही सादर करण्यात आले. आंतरराज्य नदी तंट्यावर तोडगा काढण्याची विनंती त्यांनी केली.

गैरहजेरीचे गौडबंगाल
जयललिता यांनी शुक्रवारी राष्ट्रीय हँडलूम दिनाच्या समारंभाला हजेरी लावली नव्हती. त्यामुळे त्याबद्दल चर्चा अपेक्षित होती; परंतु अम्मा या अगोदर माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या अंत्यविधीला आणि नीती आयोगाच्या बैठकीलादेखील हजर नव्हत्या. आजारी असल्याच्या वगैरे सबबी सांगून त्यांनी मीडियाला टाळले असले तरी त्यांच्या गैरहजेरीचे अलीकडे गौडबंगालच आहे.
बातम्या आणखी आहेत...