मोगा - पंजाबच्याबसमधील छेडछाडीनंतर आई-मुलीला निर्दयीपणे बाहेर फेकण्याची कृती म्हणजे ईश्वरी इच्छाच समजावी, असे बेताल वक्तव्य राज्याचे शिक्षणमंत्री सुरजित सिंग यांनी शुक्रवारी केले. अगोदरच टीकेचे लक्ष्य झालेले बादल सरकार या वक्तव्यामुळे आणखीनच अडचणीत आले आहे. दुसरीकडे कुटुंबाने बसमालकावर कारवाई करावी. त्यानंतरच १३ वर्षीय मुलीवर अंत्यसंस्कार केले जातील, असा पवित्रा घेतला आहे.
दुर्घटनांना कोणीही रोखू शकत नाही. दुर्घटना घडते ही देवाची मर्जी असते. जे घडले ते दुर्दैवी आहे. परंतु निसर्गापुढे जाता येत नाही. सरकारकडून देऊ करण्यात आलेली २० लाख रुपयांची आर्थिक मदत आणि मुलास दिलेला नोकरीचा प्रस्ताव कुटुंबाने नाकारला आहे. आधी बसमालक सुखबीर सिंग बादल यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी. वास्तविक पोलिसांनी पहिल्या दिवसापासून कारवाईस टाळाटाळ केल्याचा आरोपही या मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे. मुलीचा मृतदेह सिंहावला गावातील शवागारात ठेवण्यात आला आहे. अकाली दलाचे आमदार जोगिंदरपाल जैन म्हणाले, विरोधक आगीत तेल टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. ते पीडित कुटुंबाची दिशाभूल करत आहेत. कुटुंबाकडूनच अगोदर पैसे आणि नोकरीची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे आम्ही त्यांना आर्थिक मदत देऊ केली होती. त्याचबरोबर १६ वर्षे पूर्ण केलेल्या मुलाला नोकरीचीदेखील आम्ही हमी दिली होती, असे जैन यांनी सांगितले. परंतु काँग्रेस आणि
आप मात्र ह्या मुद्द्याचे राजकारण करू पाहत आहेत. आपने शनिवारी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या पुतळ्याचे दहन केले आणि बसमालकाच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली.
‘तिला’ पोलिस अधिकारी व्हायचे होते !
छेडछाडीच्याघटनेत मृत्युमुखी पडलेल्या मुलीला पोलिस अधिकारी होण्याची इच्छा होती. ज्या लोकांचा आवाज ऐकला जात नाही, त्यांच्यासाठी तिला पोलिसाची नोकरी करण्याची इच्छा होती, असे तिचा भाऊ संदीप सिंग आणि बालमैत्रीण सोमा रानी हिने सांगितले. गावातील बुजुर्ग दर्शन सिंग यांना ती बाबा म्हणत होती. ती माझ्याकडे येत असे आणि पोलिस व्हायचे असे नेहमी सांगायची, अशी आठवण त्यांनी सांगितली.