आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआग्रा - मुझफ्फरनगर व परिसरातील दंगलीवरून उत्तर प्रदेशात आता राजकीय नेत्यांनी राजकारणाची दंगल सुरू केली आहे. सपा नेते मुलायमसिंह यादव हे उत्तर प्रदेशचे नरेंद्र मोदी आहे, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री अजितसिंह यांनी घणाघाती टीका केली आहे. त्यांनी मुझफ्फरनगर दंगलीची तुलना सन 2002 च्या गुजरात दंगलीसोबत केली आहे. अजितसिंह यांचे गंभीर आरोप मुलायमसिंह यांनी फेटाळले. दंगलीतील बळींना न्याय दिला जाईल आणि दोषींविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, अशी घोषणा केली आहे.
दंगलग्रस्त भागास भेट देण्यासाठी निघालेले केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री व राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष अजितसिंह यांना व भाजपच्या 12 आमदारांना आज मुझफ्फनगर जिल्ह्याबाहेरच रोखण्यात आले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना अजितसिंह यांनी या दंगलीची तुलना गुजरात दंगलीसोबत केली. मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी गुजरातमध्ये मोदींने जे केले तेच उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी करीत आहे. अजितसिंहांच्या टीकेला उत्तर देताना मुलायम म्हणाले, पुन्हा दंगल करण्याचे धाडस करणार नाही एवढी कडक कारवाई दोषींविरुद्ध केली जाईल. राज्य सरकारने अनेक जणांना ताब्यात घेतले असून फरार झालेल्या दोषींनाही अटक करण्यात येईल.
अजितसिंह काय म्हणाले
सन 2002 च्या दंगलीच्या वेळेस मोदी निष्क्रिय राहिले. दंगल रोखण्यासाठी त्यांनी काहीच केले नाही. पोलिसांनाही त्यांनी कारवाई करण्यापासून रोखले आणि त्याचीच पुनरावृत्ती उत्तर प्रदेशातही झाली आहे.
आझम माझ्यावर नाराज होणार नाहीत
पक्षाने आझमखान यांच्याविरुद्ध कडक भूमिका घेतली असतानाच मुलायम सिंह यांनी मात्र त्यांच्या नाराजीवर फुंकर घातली. आझम माझ्यावर कधीही नाराज होणार नाहीत. आमच्या पक्षात लोकशाही आहे. हुकू मशाही नाही, असे मुलायम म्हणाले.
आझमखानप्रकरणी मतभेद
समाजवादी पार्टीचा ‘मुस्लिम चेहरा’ म्हणून प्रख्यात असलेले ज्येष्ठ नेते आझमखान यांच्या नाराजीवरूनही पक्षात मतभेद असल्याचे समोर आले आहे. आग्रा येथे सुरू असलेल्या सपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीस बुधवारी आझमखान अनुपस्थित राहिले होते. मुझफ्फरनगर दंगल हाताळण्यावरून ते नाराज आहेत. त्यांची गैरहजेरी फारशी महत्त्वाची नसल्याचे विधान सरचिटणीस रामगोपाल यादव यांनी केले होते. तसेच त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले होते.
संचारबंदी 9 तास शिथिल : दंगलग्रस्त मुझफ्फरनगर हळूहळू पूर्वपदावर येत आहे. गुरुवारी शहरातील दंगलग्रस्त भागात संचारबंदी नऊ तास शिथिल करण्यात आली होती. संचारबंंदीत ढील मिळताच कोतवाली, सिव्हिल लाइन्स, नई मंडी भागात जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी एकच गर्दी उसळली. दुकानांबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी शिथिल करण्यात आली. दंगलीतील बळींची संख्या 40 झाली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.