आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्ष्यांच्या संवर्धनासाठी फटाकेमुक्त दिवाळी; तामिळनाडूत जूनी परंपरा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एरोडे- फटाके आणि दिवाळी हे अलीकडच्या काही वर्षांत पर्यायवाचक शब्द वाटू लागले आहेत. परंतु सणोत्सवातही सामाजिक, पर्यावरणविषयक भान ठेवून फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची तामिळनाडूतील काही गावांत परंपरा आहे. एका अभयारण्यातील पक्ष्यांना ध्वनिप्रदूषणाचा त्रास होऊ नये, अशी बांधिलकी गावकऱ्यांनी वर्षानुवर्षे जपली आहे.

वेलोडे येथील पक्ष्यांच्या अभयारण्याच्या परिसरातील गावे फटाकेमुक्त दिवाळी साजरी करतात. पक्षी अभयारण्याच्या परिसरात ७५० कुटुंबे राहतात. ही सर्व कुटुंबे वर्षानुवर्षे दिवाळीच्या दिवशी फटाके फोडत नाहीत. फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची ही १७ वर्षांची परंपरा आहे. वेलोडे जिल्ह्यात १९९६ मध्ये पक्षी अभयारण्याची स्थापना करण्यात आली. हे अभयारण्य ८० एकर प्रदेशात विस्तारलेले आहे. मला फटाके वाजवून अनेक वर्षे झाली आहेत. अलीकडे दोन वर्षांपूर्वी आठ गावांपैकी काही ठिकाणी आतषबाजीसाठी फटाके आणण्यात आले हाेते, परंतु ते आम्ही वाजवले नाहीत, अशी आठवण चिन्नास्वामी गौंडूर (७३) यांनी दिली.

असंख्य घरटी : वेलोडे भागात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमधील पक्षी सप्टेंबर ते ऑक्टोबर काळात येतात. हा पक्ष्यांचा प्रजनन काळ आहे. अभयारण्यात हे परदेशी पाहुणे घरटी बांधतात. दोन-तीन महिन्यांच्या वास्तव्यात परिसरात असंख्य घरटी दिसू लागतात. ऑक्टोबरनंतर ते नुकत्याच पंख धरणाऱ्या पिलासोबत दूरदेशी निघून जातात.

पक्षिप्रेमाचा आदर्श
१७ वर्षांपूर्वी हे अभयारण्य सुरू करण्यात आले. त्याच वेळी आठ गावांतील गावकऱ्यांनी पक्षिप्रेम दाखवून दिले. गावाजवळ पक्षी अभयारण्य सुरू करण्यात आल्याने फटाक्यांच्या आवाजाने पक्षी घाबरून जाऊ शकतात. सप्टेंबर ते डिसेंबर हा परदेशी पाहुणे येण्याचा हंगाम असतो. त्यादरम्यान हजारो पक्षी या भागात येतात. शांतता भंग झाल्यास जैविक संस्कृतीत अडथळा येऊ शकतो. हा धोका लक्षात घेऊन शेकडो कुटुंबांनी केवळ दिव्यांची दीपावली साजरी करण्याचा संकल्प केला. तो आजतागायत पाळला जात आहे.
बातम्या आणखी आहेत...