आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवणींच्या गावी मुलांना मोफत शिक्षण, महेश्वरी यांनी उघडली शाळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमृतसर - १९९० चे ते दशक होते. पंजाबमध्ये दहशतवाद प्रचंड पेटलेला होता. दहशतवाद्यांनी एक दिवस मुलांना घेऊन जाणाऱ्या शाळेच्या बसचे अपहरण केले. यात के. आर. महेश्वरी यांचा मुलगाही होता. दहशतवाद्यांनी ती बस नंतर सोडून दिली हा भाग निराळा. परंतु यानंतर महेश्वरी यांनी अमृतसर सोडले. ते इंदूरला स्थायिक झाले. वकिली सोडून ते उद्योग क्षेत्रात उतरले. त्यांचे मन मात्र अमृतसरमध्येच होते. नंतर दहशतवाद संपला तेव्हा महेश्वरी यांनी अमृतसरमधील गरीब कुटुंबातील मुलांना मोफत शिक्षण देण्यासाठी शाळाच उघडली.

अमृतसरमधील मानव कल्याण विद्या मंदिर आज एखाद्या तीर्थक्षेत्रासारखे आहे. येथे मोफत शिक्षणासोबतच पुस्तके, गणवेश, औषधे याशिवाय पौष्टिक अन्नही दिले जाते. या शाळेतील मुलांपैकी काहींचे वडील मजुरी करतात, काही भाजी विकतात,काहींचे वडील ऑटोचालक आहेत. काही मुलांची आई दुसऱ्यांच्या घरी भांडी घासते, काही शिवणकाम करून घर चालवतात. एवढे असूनही या मुलांमध्ये प्रचंड जिद्द आहे. काही जणांना डॉक्टर, काहींना इंजिनिअर तर काही जणांना आंतरराष्ट्रीय खेळाडू व्हावयाचे आहे.
शाळेतील व्यवस्था चोख राहावी म्हणून महेश्वरी दर महिन्याला इंदूरहून येतात. दिवसभर कामकाज पाहतात. दरवेळी परत जाताना काही नवीन देऊन जातात. म्हणून मुलांच्या मनातही त्यांच्याबद्दल प्रेम आहे. महेश्वरी शाळेत दाखल होताच मुले त्यांच्याभोवती जमा होतात. महेश्वरी म्हणतात, मुलांच्या या प्रेमामुळेच मला त्यांची सेवा करण्याची उर्मी मिळते.
मुले पत्र पाठवून करतात ‘मन की बात’
शाळेतील एक विद्यार्थी अमृतपालसिंगने के. आर. महेश्वरी यांना एका पत्रात लिहिले... ‘शाळेत प्रवेश करताच माझ्या मनातील नकारात्मक विचार निघून जातात. आशादायी जगाचे चित्र समोर दिसते.’ सोनिया लिहिते, ‘तुम्ही आमच्यासाठी जी स्वप्ने पाहिली ती कष्ट करून प्रत्यक्षात उतरवून दाखवू.’ प्रिया म्हणते, ‘आई-वडिलांनी मला जन्म दिला, मात्र तुम्ही तर नवजीवन दिले आहे. ’