आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रपती निवडणूक: राजनाथांनी घेतली सोनियांची भेट, नावावर मात्र चर्चा नाही !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोनिया गांधी यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर सीताराम येचुरी यांच्याशीदेखील शुक्रवारी राजनाथसिंह,नायडू यांनी चर्चा केली. - Divya Marathi
सोनिया गांधी यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर सीताराम येचुरी यांच्याशीदेखील शुक्रवारी राजनाथसिंह,नायडू यांनी चर्चा केली.
नवी दिल्ली - राष्ट्रपती निवडणूक तोंडावर असूनही सत्ताधारी पक्ष व  विरोधी पक्ष यांच्यात शुक्रवारी झालेली सहमतीबाबतची चर्चा पुढे सरकू शकली नाही. सरकार काही नावांचा प्रस्ताव घेऊन येईल, असे विरोधी नेत्यांना वाटले तर  काही नावांचा प्रस्ताव विरोधी पक्षाकडून सादर होईल, अशी सरकारची अपेक्षा होती.
 
या दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शुक्रवारी राष्ट्रपती भवनाला भेट दिली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासोबत लंचच्या निमित्ताने झालेल्या भेटीवरून विविध तर्क लावण्यास सुरुवात झाली.
 
गृहमंत्री राजनाथसिंह, एम. वेंकय्या नायडू यांनी शुक्रवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन चर्चा केली. परंतु त्यात कोणत्याही नावावर चर्चा झाली नाही. भाजप नेते काही नावे घेऊन राष्ट्रपती पदाबाबत चर्चा करण्यासाठी आमच्याकडे येतील, असे आम्हाला वाटले होते. परंतु तसे काहीच घडले नाही. भाजपकडून कोणत्याही नेत्याचा प्रस्ताव मांडण्यात आला नाही. उलट त्यांनीच आमच्याकडे विचारणा केली, असे काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी बैठकीनंतर सांगितले. भाजपकडून या मुद्द्यावर स्थापन समितीत राजनाथ सिंह, अरुण जेटली, वेंकय्या नायडू यांचा समावेश आहे. ही समिती इतर पक्षांचीही भेट घेईल.

शहा उद्या ठाकरेंना भेटणार : अमित शहा रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे. सेनेेने मोहन भागवत यांचे नाव पुढे केले होते. मात्र आता नेते संजय राऊत म्हणाले, भागवत तयार नसतील तर कृषितज्ज्ञ एम.एस. स्वामिनाथन यांचा प्रस्ताव मांडू.

सर्व सहा अर्ज रद्द
१७ जुलैला होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी शुक्रवारपर्यंत सहा उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. परंतु पुरेशा कागदपत्रांच्या अभावी निवडणूक अधिकाऱ्यांनी ते रद्द ठरवले.

सहकार्याचे आवाहन केले : खरगे
भाजप नेत्यांनी कोणत्याही नावाचा प्रस्ताव मांडला नाही. ते नुसतेच सोनियांची भेट घेण्यासाठी आले होते. त्यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्यामुळे नावावर सहमती निर्माण होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्रकारांना सांगितले. भाजपच्या मनात काय आहे, आम्हाला ठाऊक नाही, असे खरगे म्हणाले. दुसरीकडे सर्वच पक्षांनी राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराच्या नावाबाबत कमालीची गोपनीयता बाळगली आहे.

काँग्रेस बैठकीच्या दोन दिवसांनंतर समिती सक्रिय
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत काँग्रेसने दोन दिवसांपूर्वी आझाद यांच्या संसदीय कक्षात चर्चा केली होती. त्यात विराेधी पक्षाच्या व्यूहरचनेवर चर्चा केली होती. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, द्रमुक, तृणमूल, डावे, सपा, बसप, राजद,जदयूचे नेते सहभागी झाले होते. त्यात सरकारकडून येणाऱ्या प्रस्तावाची प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र नावाबाबतचे गूढ मात्र कायम आहे.
 
 
 
बातम्या आणखी आहेत...