आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष: पुजारी रुसले, देव कुलपात, भक्तांचा धावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबादच्या एका मंदिरात दार बंद करून आंदोलन करणारे पुजारी व सेवेकरी. - Divya Marathi
हैदराबादच्या एका मंदिरात दार बंद करून आंदोलन करणारे पुजारी व सेवेकरी.
हैदराबाद - भक्त आणि ईश्वराच्या आड सध्याच्या काळी एकच व्यक्ती येऊ शकते आणि ती म्हणजे पुजारी. तेलंगणात सुमारे अडीच हजार मंदिरांतील पुजा-यांनी पगारवाढीच्या मागणीसाठी मंदिरालाच टाळे ठोकले आहे. त्यामुळे भक्त मंदिराबाहेर उभे राहून देवदर्शनासाठी धावा करत आहेत. या मंदिरात सुमारे सहा हजार पुजारी आणि सेवेकरी आहेत. त्यांना राज्याच्या तिजोरीतून पगार दिला जातो. सात वर्षांपासून ते वेतनवाढीची मागणी करत आहेत.

पगारवाढ देण्यात आली नसल्याने गुरुवारी सकाळी पुजा-यांनी देवाचे अभिषेक केले आणि नंतर सर्वच मंदिरांना टाळे ठोकले. अन्य सरकारी कर्मचा-यांप्रमाणे वेतन देण्याची मागणी मान्य होत नाही तोवर मंदिर उघडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. घटनेला आता चौथा दिवस उजाडला आहे. मात्र पुजारी व सेवेकरी मंदिरासमोर धरणे देत बसले आहेत. त्यामुळे देवाची पूजाअर्चा, आरती व इतर विधी बंद आहेत. दुसरीकडे, विविध भागांतून आलेल्या भाविकांना मात्र दर्शनाविनाच परतावे लागत आहे. दर्शन, पूजा आणि अनुष्ठानाचे तिकीट जारी होत नसल्यामुळे लोकांना नाइलाजाने ताटकळावे लागत आहे. पुजा-यांचे नेते जी.भानुमूर्ती यांच्या
मते, तेलंगणा निर्मितीनंतर नव्या सरकारने सरकारी कर्मचा-यांच्या पगारात ४३ टक्के वाढ केली. मात्र, आम्हाला त्याचा लाभ नाही. संयुक्त आंध्र प्रदेश सरकारने २००८मध्ये आम्हाला कर्मचा-यांसमान वेतन देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते पूर्ण झाले नाही.

दरम्यान, या प्रकरणी १५ ऑगस्टपर्यंत तोडगा काढला जाईल, अशी माहिती पुजा-यांच्या नेत्यांना देण्यात आली आहे. मात्र, विरोधी पक्षांनी त्यांच्यात गैरसमज पसरवला आहे. तरीही यावर तोडगा निघेल, असे सरकारचे सांस्कृतिक सल्ल्लागार के. व्ही.रामनाचारी यांनी म्हटले आहे.