आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पाटणा - महाबोधी विहाराच्या परिसरात रविवारी झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेचा तपास अद्याप प्राथमिक टप्प्यात आहे. यावरून राजकारण मात्र चांगलेच पेटले आहे. स्फोटांमागे नरेंद्र मोदींचे ‘कनेक्शन’ तपासावे, अशी मागणी काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी केली. याच्या प्रत्युत्तरादाखल भाजपने ‘माथेफिरू’ संबोधून त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे.
ट्विटने ओतले तेल : दिग्विजयसिंह यांनी सोमवारी ट्विट करून या वादात तेल ओतले. ते म्हणतात, ‘भाजप नेते अमित शहा यांनी राममंदिर बांधकामाची घोषणा केली त्याच दिवशी मोदींनी नितीशकुमार सरकारला धडा शिकवण्याची भाषा केली. दुस-याच दिवशी स्फोट झाले. याचा काही परस्पर संबंध तर नाही? एनआयएने याची सखोल चौकशी करायला हवी.’ काँग्रेस प्रवक्ते भक्तचरण दास यांनीही पाठिंबा दर्शवून दिग्विजय यांचे पाच ट्विट जुळवून त्यावर गांभीर्याने विचार केला पाहिजे, असे सांगितले.
दिग्विजय यांचे ट्विट फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. ते कायम माथेफिरूसारखे बोलत राहतात, असे भाजप सरचिटणीस अनंतकुमार यांनी म्हटले आहे. भाजप प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी दिग्विजय यांना बेताल वक्तव्ये करण्याचा रोग जडला असल्याचे सांगत टीका केली. दरम्यान, स्फोटांचा निषेध करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केंद्राच्या अकार्यक्षमतेचा हा परिपाक असल्याचे नमूद केले.
स्फोट होणारच नाहीत ही हमी कोण देईल : नितीश
बुद्धगयेत सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडेकोट होती. तरीही स्फोट झाले. यामुळे चांगला धडा मिळाला आहे. देशात कोठेही, कधीही स्फोट होऊ शकतात, याचेच हे द्योतक आहे. स्फोट होणारच नाहीत, अशी हमी कोणीही देऊ शकत नाही, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार म्हणाले.
10 स्फोट झाले, धागेदोरे हाती
राष्ट्रीय तपास संस्थेला सोमवारी महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले. या परिसरात एकूण 10 स्फोट झाल्याचे समोर आले असून सकाळपर्यंत 9 स्फोटांचीच माहिती होती. तपासात 10वा स्फोट झाल्याचे स्पष्ट झाले.
13 बॉम्ब ठेवले होते
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी 10 स्फोटांची माहिती असल्याचे सांगितले. महाबोधी विहाराच्या परिसरात 13 बॉम्ब होते, असेही ते म्हणाले. दरम्यान, स्फोटांच्या ठिकाणी सापडलेल्या ओळखपत्रावरून पोलिसांनी गया येथील एका व्यक्तीस ताब्यात घेतले आहे.
बॉम्बवर होती ठिकाणांची नावे
प्रत्येक बॉम्बवर तो कुठे पेरायचा याची माहिती होती. ठिकाणाचे नाव त्यावर लिहिलेले होते. बडा बुद्ध, इराक बदला असे शब्द यासाठी वापरले होते. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजनुसार रात्री 1 ते 2 च्या दरम्यान या परिसरात काही लोक
भिख्खूंच्या वेशात दिसत आहेत.
उद्या शहरात ‘बंद’
बॉम्बस्फोटांच्या निषेधार्थ बुधवारी औरंगाबाद बंद तसेच मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा व्यापारी महासंघही यात सहभागी होणार असून दुपारी तीनपर्यंत बाजारपेठा बंद राहतील.
संयम राखा : करमापा
लोकांनी संयम राखावा व हिंसाचार होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन करमापा ओजेन त्रिनले दोरजी यांनी केले आहे.
भारत-म्यानमार चर्चा
म्यानमारमधील मुस्लिमविरोधी दंगलींचा यात संबंध आहे काय, यावर भारत-म्यानमारच्या परराष्ट्र सचिवांनी चर्चा केली. श्रीलंका, नेपाळमध्येही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.