बंगळुरु - काश्मीरमध्ये शांतता नांदावी यासाठी आम्ही 10 वर्षे मेहनत केली. मोदी सरकारने एका महिन्यात त्यावर पाणी फेरले. गेल्या तीन वर्षात मोदी सरकारचे आपल्या मित्र राष्ट्रांसोबतचे संबंध बिघडले आहे, असा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. बंगळुरुमध्ये स्वस्तात नाष्टा आणि जेवण देणाऱ्या इंदिरा कँटिनचे राहुल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर आयोजित सभेत राहुल यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर टीका केली. राहुल गांधी बुधवारी बंगळुरु दौऱ्यावर होते. इंदिरा कँटिनमध्ये 5 रुपयांमध्ये नाष्टा आणि 10 रुपयांमध्ये जेवण मिळणार आहे.
आणखी काय म्हणाले राहुल गांधी
- स्वातंत्र्य दिनी त्यांच्याकडे (मोदी) सांगण्यासारखे काहीच नव्हते, त्यामुळे त्यांनी भाषण थोडक्यात आटोपले.
- राहुल म्हणाले, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी लाल किल्ल्यावरील कार्यक्रमाला उपस्थित होत्या. त्यांनीच सांगितले की मोदींचे भाषण हे छोटे होते.
- मोदींनी लाल किल्ल्यावरुन आतापर्यंत 4 वेळा भाषण केले आहे. 2014 मध्ये 65 मिनिट, 2015 मध्ये 86 मिनिट, 2016 मध्ये 94 मिनिट आणि यावर्षी 2017 मध्ये 55 मिनिटांचे भाषण झाले.
- चीनची घुसखोरी आणि डोकलाम वादावरुन सरकारची खरडपट्टी काढताना राहुल गांधी म्हणाले, 'चीनचे राष्ट्रपती भारतात आले होते. तेव्हा आमच्या पंतप्रधानांनी त्यांची गळाभेट घेतली होती. इकडे गळाभेट होत असताना तिकडे चीनचे हजारो सैनिक भारताच्या हद्दीत घुसत होते. काल कोणी ऐकले का की चीनची आर्मी भूतानच्या हद्दीत आहे.'
मोदी सरकारने शेजारी राष्ट्रांसोबत संबंध बिघडवले
- राहुल गांधी म्हणाले, 'काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही 10 वर्षे खूप मेहनत घेतली होती. नरेंद्र मोदी सरकारने त्यावर एका महिन्यात पाणी फेरले. रशियाने पाकिस्तानला शस्त्रास्त्रांची विक्री करण्याची पहिलीच घटना या सरकारच्या काळात झाली आहे. गेल्या तीन वर्षात मोदी सरकारने आपल्या मित्र राष्ट्रांसोबतचे संबंध खराब केले आहेत.'
- पाकिस्तान आणि चीन सोडल्यास सर्वच शेजारी राष्ट्र आपले चांगले मित्र होते. मात्र आता सर्वकाही बदलले आहे. नेपाळही आपल्यापासून दूर गेला आहे. चीनने श्रीलंकेत बेट तयार करण्याची तयारी केली आहे.
हेही वाचा...