आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Gandhi Continues Assam Visit News In Marathi

काँग्रेसमध्ये घराणेशाही प्रथा बंद -राहुल गांधी यांनी दिली माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिपू (आसाम) - काँग्रेसमध्ये यापुढे तिकिट वाटपात नातलगबाजी आणि घराणेशाही बंद होणार आहे, असे खुद्द पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ‘आम आदमी’ तूनच उमेदवार निवडीची प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

उमेदवार निवडताना नातेवाईकांना तिकिट द्यावे, असे आपल्याला वाटत नाही. काँग्रेसमधील ही पद्धत बदलली पाहिजे, असे माझे मत आहे. उमेदवार निवडताना लोक त्या प्रक्रियेत सहभागी व्हायला हवेत. त्यांनी आपला प्रतिनिधी निवडावा, असे मत त्यांनी मांडले. पक्षांतर्गत पातळीवर बदलाची नितांत गरज आहे. ही परिवर्तनाची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. म्हणूनच लोकांमधून प्रतिनिधीची निवड हे त्या मार्गावरील पहिले पाऊल आहे. आसाममधील एका रॅलीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. परिवर्तनाची प्रक्रिया सर्व मतदारसंघात टप्प्याटप्प्याने पोहचेल. प्रत्येक उमेदवाराची निवड ही निवडणुकीच्या माध्यमातून व्हायला हवी, असे वाटते. पक्षातील कोणत्याही सदस्याला यापुढे निवडणूक लढवता येऊ शकेल. त्यामुळे प्रत्येक गटातील व्यक्तीला त्यात सहभागी होता येऊ शकेल, असा विश्वास राहुल यांनी व्यक्त केला.

सत्तेचे विकेंद्रीकरण हवे
तळागाळापर्यंत सत्तेचे विकेंद्रीकरण होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर निधीचा योग्य विनियोग व्हायला हवा. सर्व कारभार दिल्लीतून चालावा, असे एक आणि दुसरे सत्ता सर्वांच्या हातापर्यंत पोहोचावी, असे मत मांडले जाते. मी विकेंद्रीकरणाच्या बाजूने आहे, असे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. कारबी प्रांतातील नऊ स्वायत्त परिषदेच्या सदस्यांना मार्गदर्शन करताना राहुल यांनी विकेंद्रीकरणाचा मुद्दा मांडला.