आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rahul Gandhi Gives Modi Govt 'zero Out Of 10'; Slams It Over Food Park In Amethi

मोदी सरकारला शेतकर्‍यांचे दहापैकी शून्य गूण : राहुल गांधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेठी - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या मतदारसंघाचा अर्थात अमेठीचा दौरा करताच राजकारण तापले असून सोमवारी त्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. रोजगाराच्या नावाखाली खोटे वायदे करून हे सरकार सत्तेत आले असल्याचे सांगून हे सरकार शेतकर्‍यांच्या जमिनी उद्योगांना विकण्याच्या बेतात असल्याचे सांगितले. माेदी सरकारला शेतकर्‍यांचे १० पैकी शून्य गुण असल्याची टीकाही त्यांनी केली.

संसद अधिवेशनाच्या काळात राहुल गांधी यांनी संसदेत सरकारवर जोरदार टीका सुरू केल्यानंतर कंेद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अमेठीचा दौरा करून राहुल यांच्या टीकेला वेसण घालण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर आता राहुल अमेठीच्या दौर्‍यावर असून त्यांनी केंद्र सरकारला घेरले आहे.

बदला घेण्यासाठी...
मोदी सरकार बदला घेण्याच्या मानसिकेतून निर्णय घेत असल्याचे राहुल म्हणाले. उत्तर प्रदेश किंवा केंद्र सरकारमध्ये काँग्रेस सत्तेत नाही त्यामुळे शेतकर्‍यांच्या हिताचे काहीही निर्णय घेऊ शकत नाही. मात्र, अन्यायकारक निर्णयांवर संसदेपासून रस्त्यावर उतरून संघर्ष करू, अशी हमी राहुल यांनी जनतेला दिली.

दहापैकी शून्य गुण...
केंद्रात मोदी सरकार स्थापन होऊन वर्ष पूर्ण होत आहे. या काळात सरकारने घेतलेल्या निर्णयांचा विचार करता गरीब आणि शेतकर्‍यांनी सरकारला गुण देण्याचा विचार केला तर ते सरकारला १० पैकी अक्षरश: शून्य गुण देतील. उलट उद्योगपती मात्र दहापैकी दहा गुण द्यायला तयार आहेत, असे राहुल म्हणाले.

फूड पार्कचे राजकारण
यूपीए सरकारच्या कार्यकाळात अमेठीमध्ये निश्चत करण्यात आलेले फूड पार्क मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने मात्र रद्द केले. यावरून राजकारण तापले आहे. येथे फूड पार्क झाले असते तर शेकडो रोजगार उपलब्ध झाले असते, असे ते म्हणाले.

शेतकर्‍यांच्या घरी जा...
मोदी सत्तेत आल्यापासून कधी शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांच्या घरी गेले आहेत का, असा प्रश्न राहुल यांनी उपस्थित केला. उलट भूसंपादनासारखे विधेयक मांडून त्यांनी शेतकर्‍यांऐवजी उद्योगपतींचे खिसे भरण्याचेच राजकारण सुरू केले असल्याचे ते म्हणाले. हे सरकार फक्त भांडवलदारांचेच असल्याची टीका त्यांनी केली.

जागोजागी स्वागत
- आपल्या मतदारसंघात फिरून प्रत्येकाच्या समस्या जाणून घेणारे राहुल गांधी यांनी एका शेतकर्‍याच्या शेतात भोजनाचा आस्वाद घेतला.
- मतदारसंघात जागोजागी राहुल यांचे जोरदार स्वागत होत असून बहुतांश भागांत ते व्हीव्हीआयपींसाठी असलेली व्यवस्था तोडून सामान्य नागरिकांप्रमाणे शेतकर्‍यांत व लोकांत मिसळले.
- राहुल गांधी मतदारसंघातील एकूण २० गावांत दौरा करणार असून या ठिकाणी आयोजित शेतकरी मेळाव्यांतही मार्गदर्शन करतील.