पणजी - गांधी घराण्याचे निष्ठावंत व काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी थेट उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वक्षमेतबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राहुल गांधी यांच्यात सत्ता राबवण्याची धमक नाही. अन्यायाविरोधात लढाई करण्याचा त्यांचा मूळ स्वभाव आहे असे वादग्रस्त विधान दिग्विजयसिंहानी केले आहे.
लोकसभा निवडणूकीतील पराभवानंतर काँग्रेस नेतृत्वावर पक्षातूनच टिका होत आहे.दिग्विजयसिंह यांनी गोव्यातील एका उपग्रहवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली. शनिवारी त्याचे प्रसारण झाले. राहुल यांनी लोकसभा निवडणूकीत नेतृत्व क रावयास हवे होते.रालोआ सरकारचा मुकाबला करण्यासाठी प्रमुख विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारीही स्विकारा असा सल्ला मी दिला होता असे दिग्विजय म्हणाले.संसदेत काँग्रेसचे गटनेते म्हणून मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. लोकसभा निवडणूकीतील पराभवासाठी काँग्रेसचा सत्तेचा मोह जबाबदार आहे. पक्ष आपला वैचारिक पायाच विसरल्याची टीकाही त्यांनी केली. निवडणूकीच्या काळात मोदी आपल्या कामाचा गवगवा करीत असताना काँग्रेसला दहा पैकी पाच कामेही सांगता आली नाहीत.असे ते म्हणाले.दिग्विजय हे पक्षाचे गोवा राज्याचे प्रभारीही आहेत.
वादंग उठताच कोलांटउडी
राहुलवरील टीके मुळे वादंग उठताच दिग्विजयसिंह यांनी कोलांटउडी घेतली. राहुल नेहमीच अन्यायाविरोधात लढले आहेत.त्यामुळेच सत्तेवर येऊ शकले नाही.त्यांना अन्यायविरुध्द लढायचे आहे त्यांच्यात आणि आमच्यात हा तर फरक आहे अशी मखलाशी डिग्गीराजाने केली.
थरूर-अँटनी साथ-साथ
धर्मनिरपेक्षतेच्या मुद्यावर लोकांचा काँग्रेसवरील विश्वास घटला असल्याचे विधान माजी संरक्षणमंत्री ए.के.अँटनी यांनी शुक्रवारी केले होते.त्यास माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांनी सहमती दर्शवली आहे. अँटनी यांच्या विचाराशी सहमत न होण्यासारखे काही कारण नाही असे थरुर म्हणाले.