आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूपीए सत्तेवर आल्यास उपचाराचा हक्क : राहुल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोईमुरा (त्रिपुरा)/ नागरकाता (प. बंगाल) - केंद्रामध्ये तिसर्‍यांदा संपुआचे सरकार आल्यास आम्ही लोकांना उपचाराचा हक्क देऊ, असे आश्वासन काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले. आम्ही सर्वांसाठी अन्न सुरक्षा निश्चित केली. मनरेगाच्या माध्यमातून रोजगार दिला, आता उपचाराचा अधिकार देण्याचा आमचा मानस आहे.

राहुल यांच्या मंगळवारी त्रिपुराच्या कोरोईमुरा आणि पश्चिम बंगालमध्ये नागरकाता येथे सभा झाल्या. त्रिपुरामध्ये ते म्हणाले, आम्ही पंचायत राज व्यवस्थेमध्ये महिलांना सामावून घेतले आहे. त्यांना हक्क दिले. आम्ही पक्षामध्येही महिला नेतृत्वाला चालना देण्यास सुरुवात केली आहे. देशभर त्रिपुरातील महिलांवर सर्वाधिक अत्याचार होतो.

त्याआधी नागरकातामध्ये राहुल म्हणाले की, पश्चिम बंगाल सरकारला कोट्यवधी रुपये पाठवले. हा पैसा मंत्री आणि आमदारांचा नाही. हा तुमचा पैसा आहे, मात्र तो तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. त्यांचे हे वक्तव्य महत्त्वपूर्ण मानले जाते. केंद्र कर्जावरील व्याजाच्या रूपात राज्य सरकारकडून खूप पैसे गोळा करत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी वारंवार केला आहे.

राहुल म्हणाले, पश्चिम बंगालच्या जनतेने जगात सर्व ठिकाणी अपयशी कम्युनिस्ट सरकारला हटवले. लोकांसाठी, गरिबांसाठी काम करणार्‍या सरकारची निवड केली. मात्र, तृणमूल ज्यांच्याविरुद्ध लढले त्यांच्यासारखेच काम करत आहे.

150 तरुण नेत्यांसोबत रणनीती आखली
राहुल गांधी यांनी सोमवारी पक्षाच्या 150 तरुण नेत्यांसोबतच्या चर्चेतून निवडणुकीची रणनीती आखली. याबरोबर त्यांनी नव्याने अवलंबलेल्या प्रायमरीजबाबत अभिप्राय मागितला. पक्षाने या वेळी अमेरिकेच्या धर्तीवर कार्यकर्त्यांच्या पसंतीनुसार काही ठिकाणचे उमेदवार ठरवले. बैठक अर्धा दिवस चालली. या वेळी केंद्रीय मंत्री आर.पी.एन. सिंह, सचिन पायलट, जितेंद्र सिंह, अजय माकन, संदीप दीक्षित, प्रिया दत्त, मीनाक्षी नटराजन, कुमारी शैलजा, शोभा ओझा, अमरिंदर सिंह लवली यांची उपस्थिती होती.

काँग्रेस आज जाहीरनामा प्रसिद्ध करणार
काँग्रेस अधिकार क्षेत्राची व्याप्ती वाढवू इच्छित आहे. त्यांनी जाहीरनाम्यात आरोग्य देखभाल आणि रोजगाराचा अधिकार देण्याची तयारी दर्शवली आहे. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी बुधवारी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध करतील. याव्यतिरिक्त भ्रष्टाचारापासून मुक्ती, 70 कोटी लोकांना मध्यमवर्गात आणणे, महिलांना आणखी हक्क देण्याबरोबर राजकारणात त्यांना जास्त वाव देण्याचा प्रयत्न असेल. जाहीरनामा प्रसिद्ध होण्यास आठवडाभर विलंब झाला आहे.